अमर घटारे/साम टीव्ही न्यूज
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून आज अमरावतीचे सुपुत्र असलेले व माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई यांचा मुलगा भूषण गवई आज शपथ घेणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज त्यांना गोपनीयतेची शपथ देणार आहे. त्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा भूषण गवई यांनी रोवला आहे.
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला असून त्यांच्या आई लेडीगव्हर्नर कमलताई गवई यांनी भूषण गवई यांच्या बालपणीच्या आठवणीला उजाळा दिला. भूषण गवई हे लहानपणापासूनच अभ्यासाला न्याय देत गेले. अमरावतीच्या महानगरपालिकेच्या एका सामान्य शाळेतून भूषण गवई यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, परिस्थिती चांगली असली म्हणजेच मुलं मोठे होतात असं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
"आज माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई हयात असते, तर सुपुत्र भूषण गवई यांच्या यशाने ते निश्चितच आनंदी झाले असते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भूषण गवई यांचे व्यक्तिमत्व घडले. हायकोर्टाचे न्यायाधीश होण्याच्या निर्णयामागेही रा.सू. गवई यांचे विचार प्रभावी ठरले.
'वकील म्हणून पैसा मिळेल, पण न्यायाधीश म्हणून देशसेवा करता येईल' हे त्यांचे शब्द भूषण गवई यांना अंतःकरणापर्यंत भिडले. मुलांनी माणूस म्हणून जगावं हीच माझी खरी अपेक्षा होती, असे उद्गार या भावनिक क्षणी व्यक्त करण्यात आले."