विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, झालं असं की….
GH News May 14, 2025 08:08 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेला जून 2025 पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्ती घेतल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. या दोन दिग्गजांची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान बीसीसीआयपुढे आहे. असं असताना या दोघांनी केंद्रीय करार जाहीर झाल्यानंतर मध्यातच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोघांची वार्षिक ए+ श्रेणीबाबत कायम राहिल की नाही? याबाबत प्रश्न विचारत आहे. आता बीसीसीआयने याबाबत अपडेट दिला आहे. एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्तीनंतरही ग्रेड ए+ करारात कायम राहतील. सैकिया यांनी पुढे सांगितलं की, ‘विराट आणि रोहित दोघांनीही टी20 नंतर कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही त्यांचे ग्रेड ए+ करार सुरू राहतील. ते अजूनही भारतीय क्रिकेटचा एक भाग आहेत आणि त्यांना ग्रेड A+ च्या सर्व सुविधा मिळतील.’

काय आहे बीसीसीआयचा नियम?

बीसीसीआयच्या नियमानुसार, तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना वार्षिक करारात ए+ ग्रेड दिली जाते. पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. पण कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळणार असं स्पष्ट केलं होतं. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना गाठता आला नाही. तर चौथ्या पर्वाची तयारी सुरु झाली असताना विराट आणि रोहितने निवृत्ती घेतली. त्यामुळे दोन्ही खेळाडू त्या नियमात बसत नाही. तरीही या दोघांचा ए+ ग्रेड कायम राहणार आहे. ए+ ग्रेड असणाऱ्या खेळाडूंना वार्षिक मानधन म्हणून बीसीसीआयकडून 7 कोटी रुपये मिळतात. ए कॅटेगरी असलेल्यांना 5 कोटी, बी कॅटेगरीत खेळाडूंना 3 कोटी आणि सी कॅटेगरीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.

विराट-रोहित वनडे वर्ल्डकप 2027 खेळणार?

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडे क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढच्या वनडे मालिकेत हे दोन्ही खेळाडू ब्लू जर्सीत दिसतील. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2027 खेळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण दोन वर्षानंतर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.