ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने खोट्या गोष्टी पसरवण्यास सुरुवात केली आहे. खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन मिलट्री एक्सपर्ट टॉम कूपर आणि अमेरिकेचे युद्ध तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारचा बुरखा फाडला आहे. या दोन्ही मिलिट्री तज्ज्ञांनी गेल्या तीन चार दिवस चाललेल्या लढाईत भारताचाच विजय झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी भारताला केविलवाणेपणे साकडं घातलं. त्यात काही नवीन नव्हतं. कारण पाकिस्तानचं एवढं नुकसान झालं होतं की त्यामुळे पाकिस्तान घाबरला होता. त्यामुळेच शस्त्रसंधी करण्याशिवाय पाककडे पर्याय उरला नव्हता, असं या दोन्ही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
टॉम कूपर हे जगातील सर्वात सन्मानिय युद्ध विशेषज्ञ आहेत. युद्ध इतिहासकार आहेत. कूपर हे विश्लेषक, लेखक आणि मध्यपूर्व पासून ते दक्षिण आशियापर्यंतच्या एअर वॉरचे एक्सपर्ट आहेत. 6 आणि 7 मे दरम्यान रात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताने भारताच्या अनेक सैन्य ठिकाण्यांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताने त्यांच्या कारवाईचं जशास तसे उत्तर दिलं. एक आठवडा चाललेल्या या घटनाक्रमावर टॉप कूपर यांनी एक ब्लॉग लिहिला आहे.
टॉम कूपर म्हणतात, भारतीय सैन्याच्या समोर पाकिस्तानी आर्मी टिकू शकली नाही. भारताने पाकिस्तानच्या आत घुसून ज्या पद्धतीने हाहा:कार माजवला, त्यातून पाकिस्तान पराभूत झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच सीजफायर व्हावी म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला साकडे घातले, असं सांगतानाच भारताची हा क्लिअर कट विजय असल्याचं कूपर यांनी म्हटलं आहे.
सरळ सरळ सांगतो, जसं नेहमी सांगतो. एक देश दुसऱ्या देशाच्या अण्वस्त्र भंडारावर बॉम्ब फोडत असेल आणि दुसरा देश काहीच करण्याच्या स्थितीत नसेल तर माझ्या मते हा सरळ सरळ विजय आहे. इस्लामाबादकडून सीजफायरसाठी साकडं घालणं ही काही नवीन गोष्ट नाहीये, असं कूपर ब्लॉगमध्ये म्हणतात.
भारताची कारवाई पाकिस्तानपेक्षा किती तरी मोठी होती. यात भारताचा थेट विजय झाला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये कमीत कमी पाच मुख्य अतिरेकी मारल्या गेले. तसेच इतर 140 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यावर पाकिस्तानच्या सरकारने मौन बाळगलं आहे. पण आयएसआयने या अतिरेक्यांना शहीद ठरवून त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या अधिकारांसोबत राजकीय सन्मान दिला आहे. यावरून अतिरेक्यांचा पाक सैन्याशी थेट संबंध असल्याचं स्पष्ट होतं, असं त्यांनी म्हटलंय.
पहलगामवरील हल्ल्याचा बदला घेण्याची भारताची कारवाई यशस्वी ठरली आहे. पाकिस्तान फेल गेला आहे. भारताने केवळ अतिरेकी कॅम्पावर हल्ला केला नाही, तर पाकिस्तानचे हल्ले कुशलतेने परतवून लावले आहेत. पाकिस्तानचे हल्ले भारताची एअर डिफेन्स सिस्टिम एस-400, बराक, आकाश, स्पायडर आणि बोफोर्सला पार करू शकले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलंय.
इंड्स वॉटर ट्रीटी सस्पेन्शनमध्ये टॉम कूपर म्हणतात, भारताने पाणी रोखलं. पाकिस्तान काहीच करू शकला नाही. खरं तर पाकिस्तानसाठी ही रेड लाईन होती. पाकिस्तानने काहीच धडा घेतला नाही. भारताने पाकिस्तानच्या धमक्या गंभीरपणे घ्यायचं सोडून दिलंय हे पाकलाही कळलं नाही. याशिवाय भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी आणि कराची या महत्त्वाच्या शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम HQ-9 नेस्तनाबूत केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर आला. पाकिस्तानला स्वत:हून भारताशी सीजफायरबाबत बोलावं लागलं, असंही कूपर यांनी स्पष्ट केलंय.
जॉन स्पेन्सर हे अमेरिकेतील प्रसिद्ध शहरी युद्ध विशेषज्ञ आहेत. स्पेन्सर हे मॉर्डन वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्ध अभ्यासाचे चेअरमन आहेत. त्यांनी एक्सवर एक विस्तृत लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी भारताने 7 मे रोजी सटीक हल्ला करून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
अतिरेक्यांनी हल्ला केल्यावर भारताने पूर्वीप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघाचा दरवाजा ठोठावला नाही. किंवा पाकिस्तानला पोकळ धमकी देण्याचं कामही केलं नाही. भारताने थेट लढाऊ विमाने पाठवली आणि अचूक लक्ष्यावर हल्ला केला. ही केवळ एक प्रतिकात्मक कारवाई नव्हती, तर ठरवून केलेली सैन्य रणनीती होती. भारताने ही कारवाई करून आता पाकिस्तानकडून झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धच मानला जाणार आहे, हा संदेशच भारताने दिला आहे, असं जॉन स्पेन्सर यांनी म्हटलंय.
भारत अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही हे भारताच्या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. भारत आता दहशतवाद आणि चर्चा दोन्ही गोष्टी एकसाथ स्वीकारणार नाही. खून आणि पाणी एकसाथ वाहू शकत नाही, हाच नव्या भारताचा सिद्धांत आहे. भारत आता जुन्या युद्धाची नव्हे तर येणाऱ्या युद्धाची तयारी करत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
या ऑपरेशनचा हेतू बदला घेणं नव्हता. तर भारत आता दहशतवादाच्या विरोधात आक्रमकपणे पुढे जात आहे दे दाखवणं होतं. भारताने एक झटका सहन केला, लक्ष्य ठरवलं आणि ते मिळवलं. तेही कमी वेळात आणि मर्यादित सीमारेषत, असं त्यांनी सांगितलं.
जगभरात युद्ध दीर्घकाळ सुरू राहते आणि दिशाहीन होतं. तसेच उद्देशहीनही होतं. भारताने सीमित युद्धाचं उदाहरण घालून दिलं आहे. उद्देश स्पष्ट होता. पद्धत स्पष्ट होती आणि नेतृत्व मजबूत होतं, असं सांगतानाच जॉन स्पेन्सर यांनी भारताच्या संयमाचंही कौतुक केलं. भारताचा संयम ही त्याची कमजोरी नाही. त्यांची परिपक्वता आहे. त्यांनी दुश्मनांना पाणी पाजलं. नवीन सीमा रेषा आखली आणि राजकीय बढत कायम ठेवली, असं सांगतानाच ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. हा धोरणात्मक विराम आहे. कायमचा युद्धविराम नाही. जर पुन्हा हल्ला झाला तर भारत तसंच उत्तर देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.