किरकोळ वादातून एकावर प्राणघातक हल्ला
कर्जत (बातमीदार) ः शहरात किरकोळ वादातून एका व्यापाऱ्यावर तीन ठिकाणी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीर अन्सारी या व्यावसायिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुपारी झालेल्या वादाची तक्रार द्यायला आलेल्या जमीर यांना आणि कुटुंबीयांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवले असता दवाखान्यासमोरच जमीर यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला. आरोपींमध्ये जमीर यांचेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
आमराई येथे टेलरिंगचे दुकान चालवणारे जमीर अन्सारी यांच्यासोबत पहिला वाद त्यांचा नातेवाईक सद्दाम अन्सारी याने दुकानात येऊन केला. वादाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दुकानाचे नुकसान करण्यात आले. त्यानंतर सद्दामचा भाऊ हमीद हा जमीर यांच्या दहिवली येथील घरी पोहचला आणि तेथेही मारहाण करत कुटुंबीयांनाही लक्ष्य केले. जमीर यांचे भाऊ अमीर यांच्या हाताला चावा घेत जखमी केले. जमीर यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र जमीर यांना पुन्हा एकदा रुग्णालयासमोरच भररस्त्यात सद्दाम व हमीद अन्सारी यांनी रोखले आणि लोखंडी पाइपने डोक्यावर घाव घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रसंगावधान राखून कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.