अकोल्यातील खामगांवजवळ झालेल्या अपघातात इस्रोत शास्त्रज्ञ असलेल्या निकेतन पवार या २६ वर्षीय तरुणासह त्याच्या आई आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे. पवार कुटुंबिय नांदेंडमधील लोकरवाडी इथून उज्जैनला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून परतताना त्यांच्या आर्टिगा कारची ट्रकला धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेडच्या लोकरवाडी इथले निकेतन पवार हे इस्रोत शास्त्रज्ञ होते. २६ वर्षीय निकेतन पवार हे वडील गंगाराम पवार, आई बेबिताई पवार, दोन बहिणी, भाची आणि नातेवाईकांसह उज्जैनला देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपून परतताना १३ मे रोजी रात्री १ वाजता त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला होता. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी २ तास प्रयत्न सुरू होते. पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात निकेतनसह त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
इस्रोत वैज्ञानिक, सुट्टीवर आले असताना अपघात
निकेतन पवार हे नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोत रूजू झाले होते. ते वैज्ञानिक होते. सुट्टीवर आल्यानंतर उज्जैनला महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना बुलढाण्यात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.