भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आहे. पाकिस्तानकडून भारताला कडाडून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न पाकिस्तानच्याच अंगलट आला. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्याशी संबंधित 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. यात अनेक खतरनाक अतिरेक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्ताने भारतासोबत शस्त्रसंधी केली. पण अजूनही पाकिस्तानला भारताची भिती वाटत आहे. भारत केव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो असं पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानच्या एका बड्या नेत्यानेच ही भीती आणि भविष्यवाणीही केली आहे.
पाकिस्तानचे न्यूज चॅनल समा टीव्हीवरील एका कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक यांनी ही भीती आणि भविष्यवाणी व्यक्त केली आहे. मेचा महिना अत्यंत महत्त्वाचा असेल. खासकरून पुढचे 17 दिवस. कारण युद्धविराम झाल्यानंतरही तणाव कायम आहे. येत्या 17 दिवसात भारत पुन्हा पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो. भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. लढाई अजूनही संपलेली नाही, असं नदीम मलिक यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तणाव वाढण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या अपप्रचाराचीच री ओढली. पाकिस्तानने भारताच्या पाचहून अधिक विमानांना पाडलं आहे, असं सांगतानाच युद्ध संपलेलं नाही. फक्त युद्धविराम लागू आहे, असं मलिक म्हणाले.
पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती नवीन गोष्ट नाही. पहलगाम येथील हल्ल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली होता. भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानची ही भीती वास्तवात आणली. भारताने या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. 100 हून अधिक दहशतवादीही ठार केले.
त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. त्यानंतर भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवून लावले. सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी लागू आहे. पण तरीही पाकिस्तानी नेते आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे.