Rohit Sharma : कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी; फडणवीस म्हणाले...
esakal May 14, 2025 05:45 PM

Rohit Sharma Met CM Devendra Fadnavis: भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने नुकताच कसोटी किक्रेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. रोहितने अचानक निवृत्ती घेतल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. यानिर्णयानंतर अनेकांनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. अशातच आता रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी ही भेट झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, '' यांची आज वर्षा निवास्थानी भेट झाली. यावेळी त्यांचं स्वागत केलं. या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.''

रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2013 मध्ये कसोटीत पदार्पण केलं. त्याने 67 कसोटी सामने खेळले असून 40.57 च्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. 212 धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे.

रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. त्याने भारतासाठी 273 एकदिवसीय सामने खेळले असून 48.77 च्या सरासरीने 11 हजार 168 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके लगावण्याचा विक्रम आहे. याशिवाय 32 शतके आणि 58 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

रोहित सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 300 धावा केल्या आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.