बालाजी सुरवसे
धाराशिव : महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयात आज मंदिरातील पुजाऱ्याने दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नाही तर कार्यालयात तोडफोड देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे.
मंदिरातील पुजारी अनुप कदम यांनी १३ एप्रिल रोजी मंदीराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदीरात प्रवेश केला होता. त्यानंतर १५ एप्रिल रोजी देखील सिसिटिव्ही कंट्रोल रुमच्या दरवाज्याला लाथ मारली. त्यामुळे मंदीर संस्थानच्या वतीने देऊळ कवायत कायद्यानुसार ३ महिन्यांची मंदीर प्रवेश बंदी का? करण्यात येवु नये याचा लेखी खुलासा करण्याची नोटीस दिली.
नोटीस दिल्याच्या कारणाने घातला गोंधळ
धाराशिव जिल्ह्यातील येथील तुळजाभवानी मंदीर संस्थानकडुन देऊळ काव्यात कायद्यानुसार पुजारी अनुप कदम यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी दारु पिऊन तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या कार्यालयात येवुन तहसीलदार यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत गोंधळ घातला. तसेच तोडफोड केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुजारी अनुप कदम यानी १३ मे रोजी दारु पिऊन येत संस्थांच्या कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यावेळी काही जणांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत कार्यालयात तोडफोड केली. पुजाऱ्याकडून करण्यात आलेल्या या प्रकरणानंतर संस्थांकडून तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.