Sangli: 'माजी सैनिकाचा अपघाती मृत्यू'; दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, पोलिस ठाण्यात घटनेची नोंद
esakal May 14, 2025 07:45 PM

जत : विजयपूर मार्गावर जतपासून साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू झाला. कामगोडा रायगोंडा आवटी (वय ५०, कनमडी, जि. विजापूर) असे मृताचे नाव आहे. सोमवारी (ता. १२) दुपारी ही घटना घडली. जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

मुचंडीजवळ असणाऱ्या कनमडी गावातील माजी सैनिक कामगोडा आवटी हे कामानिमित्त कनमडीतून जतकडे येत असताना जतपासून साडेसात किलोमीटर अंतरावर जत-मुचंडी रस्त्यावरील लिंग ढाबा येथे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुचाकी घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणले.

डॉक्टरांनी तपासणीनंतर गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारांसाठी सांगलीला हलवले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणला. या घटनेची नोंद रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात झाली. कामगोंडा आवटी सैन्यदलातून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे मुलगा व मुलगी असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.