आयपीएल 2025 स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. उर्वरित सामन्यांवर प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. कारण चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. मात्र उर्वरित सात संघात प्लेऑफसाठी चुरस आहे. एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. असं असताना काही विदेशी खेळाडू मात्र या स्पर्धेत भाग घेणं कठीण आहे. त्यामुळे बीसीसीआयने आपल्या नियमात एक मोठा बदल केला आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात विदेशी खेळाडूंना रिप्लेस करण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझींना प्लेयर साईन करण्याची सूट दिली आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या नियमानुसार साखळी फेरीतील 12 सामने झाल्यानंतर संघात एखादा खेळाडू जखमी, आजारी किंवा काही कारणास्तव बाहेर गेला तर त्याला रिप्लेस करता येणार नाही. या पर्वात सर्वच संघ 12 सामने खेळले आहेत. पण सद्यस्थिती पाहता बीसीसीआयने नियमात सूट दिली आहे. यामुळे प्रत्येक संघ नवा खेळाडू संघात सहभागी करू शकतो.
बीसीसीआयने नियमात सूट दिली असली तरी एक अट ठेवली आहे. सद्यस्थितीत बदली केलेले खेळाडू हे तात्पुरते असणार आहेत. म्हणजेच फक्त या पर्वासाठी संघाचा भाग असतील. म्हणजेच पुढच्या पर्वात खेळण्यासाठी त्यांना रिटेन केलं जाणार नाही. खरं तर रिप्लेस केलेल्या खेळाडूला रिटेन करण्याची मुभा असते. पण ज्या खेळाडूंना या पर्वात साइन केलं जाईल त्यांना फक्त या पर्वात खेळण्याची परवानगी मिळेल. बीसीसीआयकडून ही सूट सर्वच्या सर्व दहा संघांना मिळाली आहे. पण सर्वाधिक फायदा 7 संघांना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत.
आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु झाली आहे. 18व्या पर्व सुरु असताना 9 मे पासून स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर 12 मे रोजी बीसीसीआयने उर्वरित 17 सामन्यांसाठी नवं वेळापत्रक जाहीर केलं. ही स्पर्धा आता 17 मे ते 3 जून दरम्यान होणार आहे.