NCP Party : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अफवाच; चर्चांवर अजित पवार यांच्याकडून पडदा
esakal May 15, 2025 04:45 AM

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पूर्णविराम देण्यात आला असून असा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नेत्यांच्या पातळीवर सुरु नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (ता.१३) रात्री पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा स्पष्ट शब्दांत आमदारांना सांगितले.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. तसेच असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आलेला नाही, असे नमूद केले. यासंदर्भात भविष्यात असा प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते आणि कोअर कमिटी याबाबत चर्चा करून निर्णय घेईल. असेही त्यांनी सूचित केले.

सध्या अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे परांजपे यांनी सांगितले. सध्या माध्यमांमध्ये केवळ उलट सुलट चर्चा सुरु असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हणाले.

चर्चा फक्त माध्यमांत - देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीही अशा प्रकारच्या चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्येच होत असून, त्या निराधार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

दो न्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार सचिन अहीर यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नसले तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण, महाविकास आघाडी भूमिका यावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील चार दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेला आला आहे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीची बैठक सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली. काहीवेळातच आमदार सचिन अहीर हे देखील पवार यांना भेटण्यासाठी सेंटरवर दाखल झाले.

काही वेळ चर्चा झाल्यानंतर अहीर हे पवार यांच्या गाडीतूनच त्यांच्यासोबत ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी गेले. राष्ट्रवादी एकत्रीकरण चर्चेनंतर महाविकास आघाडीत मात्र बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.