मनोर परिसरातील चार शाळा शंभर नंबरी
esakal May 15, 2025 06:45 AM

मनोर, ता. १४ (बातमीदार) : मनोर परिसरातील चार शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे नसल्याचे समोर आले आहे. नावझे गावातील स्वर्गीय वत्सला वसंत पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल सलग १३व्या वर्षी, मनोरच्या कोकण उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अली अल्लाना इंग्लिश स्कूलचा निकाल सलग पाचव्या, तर मनोरच्या जनरल एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत नारायण चाफेकर इंग्लिश हायस्कूलचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. आदिवासीबहुल दुर्गम भागातील एम्बूर आश्रमशाळेसह नावझे गावातील स्वर्गीय वत्सला वसंत पवार माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मनोर येथील यशवंत नारायण चाफेकर इंग्लिश हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, निधी मनोज काळे ही ९२.८० टक्के गुणासह पहिली आली. अली अल्लाना इंग्लिश स्कूलमधील सर्व ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, आवारी रिया झहीद ही ८६.८० टक्के गुणांसह पहिल्या स्थानी आली. एम्बूर शासकीय आश्रमशाळेमध्ये तनिषा गवळी हिने ७६.८० टक्के गुणांसह बाजी मारली. नावझे येथील स्व. वत्सला वसंत पवार माध्यमिक विद्यालयातील पलक नितीन पाटील हिने ९१.८० टक्के गुण पटकावले. विद्या विनोद अधिकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.७४ टक्के लागला असून, ३८३ पैकी ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चाहतकुमारी कुशवाह ही ९२.८० पहिली आली. बहाडोली येथील नूतन विद्यालयाचा निकाल ९८.६१ टक्के लागला असून, करण मुकेश पाटील याने ८७ टक्के गुणासह पहिले स्थान पटकावले.

दहिसरतर्फे मनोरमधील स्वातंत्र्य सैनिक न. ल. पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.१३ टक्के लागला आहे. १०७ पैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अल्फीया इमरान शेखला ८५.२० टक्के गुण मिळाले. हालोली येथील साईबाबा विद्यालयाचा निकाल ८६.८८ टक्के असून, संकेत सांबरे याने ७८.४० टक्के गुणांसह बाजी मारली. मनोर येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल व श्रीमती सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८५.४४ टक्के लागला असून, २६१ पैकी २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ऋतूराज बाबू आंबात याने ९०.६० टक्के गुणांसह पहिले स्थान पटकावले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.