आजारपणात माहीची कौतुकास्पद कामगिरी
ऑक्सिजन सिलिंडरसह दिली दहावीची परिक्षा; ८६ टक्के गुण प्राप्त
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : सीआरएम ओक विद्यालयाच्या माही देशवंडीकर या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि आजारपणाशी लढा देत दहावीत ८६ टक्के गुण मिळवले आहेत. माही अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याने तिला शाळेत जाता येत नव्हते. याही परिस्थितीत फक्त घरीच अभ्यास करून माहीने हे यश मिळवल्याने तिचे खास कौतुक होत आहे. तिने दहावीची परीक्षा देतानाही ऑक्सिजन सिलिंडरसह उपस्थित राहून पेपर सोडवले होते.
दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी यंदा यश मिळवले असले तरी कल्याण पश्चिमेला पारनाका येथे राहणाऱ्या १६ वर्षीय माही देशवंडीकर हिचे यश खूप अनोखे आहे. कारण माहीला वयाच्या आठव्या वर्षांपासून सिस्टिक फायब्रोसिस हा आनुवंशिक आजार आहे. यामुळे तिच्या फुप्फुस, यकृतासह इतर अवयवांत एक घट्ट व चिकट पदार्थ तयार होतो. यामुळे तिला बाहेरील वातावरणात जाता येत नाही, तसेच तिला सतत ऑक्सिजन सिलिंडरची मदत घ्यावी लागते. मास्कचा वापर करावा लागतो. ती कल्याण पश्चिमेकडील सीआरएम ओक शाळेची विद्यार्थिनी आहे; मात्र या आजारामुळे तिला गेल्या दोन वर्षांत शाळेत जाता आलेले नाही, अशी माहिती सीआरएम ओक शाळेचे इंग्रजीचे शिक्षक बाळकृष्ण शिंदे यांनी सांगितले.
आजारपणातही तिने दहावीचा घरी थांबून उत्तम अभ्यास केला. तसेच दहावीत ८६ टक्के गुण मिळवले. तिला सामाजिक विज्ञान या विषयात ९१ गुण आहेत. तर मराठी व संस्कृतमध्ये ८८ गुण मिळाले आहेत. तिच्या या यशात तिच्या पालकांचाही मोठा वाटा आहे. तिची आई शर्मिला देशवंडीकर यादेखील शिक्षिका आहेत. त्यांनी अनेकदा शाळेत जाऊन तिचे विषय समजून घेत तिला घरी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सीआरएम ओक शाळेच्या शिक्षकांनी तिला वेळोवेळी ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच, वर्षभरात शाळेत होणाऱ्या परीक्षांचे पेपरही तिने वेळेत सोडवले. हे पेपर अत्यंत सुवाच्च्य अक्षरात तिने सोडवले होते. या पेपरचा दाखला शाळेतील इतर विद्यार्थ्यांना दिल्याचे बाळकृष्ण शिंदे यांनी स्पष्ट केले. घरी अभ्यास करून आणि कोणत्याही क्लासमध्ये न जाता चांगले गुण मिळवता येतात हे याचे उत्तम उदाहरण माही देशवंडीकर हिने घालून दिले आहे. यामुळे सध्या सर्वच स्तरातून माहीचे कौतुक होत आहे.