टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहितने आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर आणि आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान कोणतीही पूर्वकल्पना न देता असा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. रोहितने निवृत्तीनंतर कोणताही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2025 भारत-पाकिस्तान स्थगित करण्यात आल्याने रोहित ऑन फिल्ड दिसला नाही. रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता 17 मे पासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे रोहित शर्माने सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना 21 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. रोहितचा निवृत्तीनंतर पहिलाच सामना असणार आहे. मात्र त्याआधी रोहितचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “खेळाडूंसोबत घाणेरडं बोलायला हवं”, असं रोहितने नक्की का म्हटलं? जाणून घेऊयात.
रोहित शर्मा याची बोलण्याची खास पद्धत आहे. रोहित मैदानात कर्णधार नाही तर मोठ्या भावासारखा वाटतो, असं अनेक खेळाडूंनी आतापर्यंत सांगितलंय. रोहित माध्यमांसोबतही त्याच विनोदी पद्धतीने बोलतो. रोहितचा हाच अंदाज अनेकांना आवडतो. रोहितने निवृत्तीनंतर मुलाखत दिली. रोहितचा या मुलाखतीतही तो खास अंदाज पाहायला मिळाला. “खेळाडूंसह घाणेरडं बोलायला हवं. घाणेरडं म्हणजे तुला का खेळवलं नाही?”, असं रोहित म्हणाला. यावर मुलाखत घेणारा म्हणाला “अच्छा तुम्ही संधी देण्याबाबत म्हणत आहात”. त्यावर रोहित पुन्हा मुलाखत घेणाऱ्याला प्रत्युत्तर देतो. “तुम्ही कायम वेगळाच अर्थ काढता”, असं रोहित म्हणतो. त्यानंतर दोघेही हसतात. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
रोखठोक रोहित शर्मा
रोहितने 2013 साली कसोटी पदार्पण केलं. रोहितची कसोटी कारकीर्द ही 12 वर्षांची राहिली. रोहितने याआधीच टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे आता रोहित एकदिवसीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहितचा त्याच्या होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये विशेष सन्मान केला जाणार आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाला भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव नियंत्रणात आल्यानंतर 17 मेपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी 16 मे रोजी हिटमॅनच्या उपस्थितीत दिवेचा पॅव्हेलियन लेव्हल 2 ला रोहित शर्मा याचं नाव दिलं जाणार आहे.