विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर अभिनेता झाला भावुक, बीसीसीआयला पत्र लिहित म्हणाला…
GH News May 16, 2025 12:07 AM

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. रोहित शर्माच्या निवृत्तीचं दु:ख होत असताना आणखी एक धक्का पचवणं क्रीडाप्रेमींना कठीण झालं. फॅन्सने विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर रान पेटवलं आहे. विराट कोहलीने निवृत्ती मागे घ्यावी यासाठी त्याला विनवणी करत आहेत. फॅन्ससह आता सेलिब्रेटिंनीही निराशा व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर सेलिब्रेटीही पोस्ट करत आहेत. इतकंच काय आपल्या निवृत्तीबाबत पुन्हा विचार करण्यास सांगत आहेत. आता भारताचा माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आणि अभिनेता अंगद बेदी यांनी विराट कोहलीला पुन्हा विचार करण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयकडे विनंती केली आहे. विराट कोहलीने फेयरवेल मॅच न खेळताच कसोटीतून निवृत्ती घेतल्याची बाब त्याला रुचली नाही. विराट कोहलीने फेयरवेल सामना खेळायला हवं असं त्याचं मत आहे. त्याची कसोटी कारकीर्द इतक्या शांतपणे कशी संपू शकते? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. तसेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या सामन्याचा उल्लेख केला.

अभिनेता अंगद बेदीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘वानखेडे 2013.. सूर्य मावळला आणि घोषणाबाजीने वेग धरला. जग थांबल्यासारखं झालं. सचिन तेंडुलकरचं निवृत्तीचं भाषण. एक अब्ज लोकांच्या हृदयात बसलं. एक आयकॉन, आऊट होताच टीव्ही बंद झाले.’ असं त्याने सुरुवातीला लिहिल्यानंतर पुढे सांगितलं की, ‘आम्हाला असं वाटतं की आम्ही परत कधी असं अनुभवू शकत नाहीत. पण नंतर विराट कोहलीची एंट्री झाली. तो फक्त एक खेळाडू नाही तर ताकद आहे. त्याने आमच्या संघाला आग, एक एटीट्यूड आणि आत्मा दिली. सर्वकाही एक चार्ज बनले, प्रत्येक सामना एक क्षण बनला आणि आता तो स्क्रीनवर फक्त एका पोस्टने संपतो? इतका महान वारसा इतक्या शांतपणे संपू शकतो का?’

अंगद बेदीने बीसीसीआयकडे केली विनंती

अभिनेता अंगद बेदीने बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना विनंती करत विराटशी चर्चा करण्यास सांगितलं. अंगदने लिहिलं की, ‘भारतीय क्रिकेटचा एक चाहता म्हणून मी बोर्डाकडे विनंती करतो की, विराटशी चर्चा करा. त्याला पुर्नविचार करण्यास भाग पाडा आणि विराट आम्ही तयार नाही. पुन्हा ये एक शेवटचं. आमच्यासाठी.. स्टँडमध्ये बसलेल्या त्या मुलीसाठी जिने घातलेल्या जर्सीवर तुझं नाव आहे. गल्ली क्रिकेटमध्ये तुझ्या स्टांसची नकल करण्याऱ्या मुलांसाठी. त्या भावनेसाठी जी तू एक अब्जाहून अधिक लोकांना दिली. तू निवृत्तीचा हकदार आहेस. हे कायम लक्षात ठेवलं जाईल आणि आम्ही तुझ्या फलंदाजीचा शेवट बघण्याचे हकदार आहोत.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.