मंचर - आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी गावातील शेतकरी कुटुंबातील अविनाश एरंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत राज्यात १४७ वा क्रमांक पटकावीत घवघवीत यश संपादन केले.
त्यांची नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदावर झाली आहे. अविनाश यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे कोल्हारवाडी गावच्या नावलौकिकात भर पडली असून, संपूर्ण गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
५५ हजार उमेदवारांनी दिलेल्या या परीक्षेमधून अविनाश यांनी यश संपादन करून आपली मेहनत आणि जिद्द सिद्ध केली आहे.
या यशानिमित्त कोल्हारवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शौर्यवीर अशोकराव किसनराव एरंडे यांच्या ३३ व्या शौर्य दिनानिमित्त विठ्ठल महाराज लवंगे यांच्या हस्ते अविनाश आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. यावेळी भाजप नेते जयसिंग एरंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
एरंडे म्हणाला, ‘माझा पहिला पगार गावचे ग्रामदैवत आई मुक्ताईच्या चरणी अर्पण करणार असून, त्या पैशातून मंदिरासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येईल.’ अविनाशच्या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून, युवा पिढीसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.