आईचे आरोग्य
esakal May 16, 2025 12:45 PM

- डॉ. मालविका तांबे

प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात स्त्री बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असते, परंतु त्यातील सगळ्यांत महत्त्वाची भूमिका असते ती आईची. आई जन्म देते, सांभाळ करते, भविष्य घडवते, जीवनातील प्रत्येक पावलावर साथ देते, काही चुकले तर, काही हवे असले तर आधार देते, मदत करते, एवढेच नव्हे तर आपल्या मुलांकरिता काहीही करायला ती कधीच मागे पुढे बघत नाही. यावेळी ‘मदर्स डे’निमित्त शाळेतल्या मुलांकरिता एक संवाद साधला होता, ज्यात मुलांना आईकरिता काय करता येऊ शकेल, याबद्दल मनापासून फार कुतूहल होते.

तसे तर आयुर्वेदात स्त्रीच्या आरोग्याचा विचार लहान मुलीपासून ते वृद्धावस्थेपर्यंत केलेला आहे, परंतु आई म्हणून आपण जेव्हा स्त्रीआरोग्याचा विचार करतो तेव्हा तो साधारणपणे मध्यमवयीन स्त्रीचा, ४०च्या पुढच्या वयाच्या स्त्रीचा करावा लागतो. युवावस्थेपासून प्रौढावस्थेकडे जाताना तिला जेवढी मदत करता येऊ शकेल तेवढे तिचे आरोग्य व युवावस्था टिकून राहायला मदत होते.

स्त्रीआरोग्याचे पहिले लक्षण आहे तिची पाळी. पाळी नियमित असली तर तिच्या शरीरात हॉर्मोन्सचे संतुलन टिकून आहे हे आपल्याला कळते. आयुर्वेदानुसार पाळी येण्याची क्रिया रस धातूशी संबंधित असते.

रस धातू व्यवस्थित राहण्यासाठी शरीरात वातदोषाचे संतुलन असणे अर्थात कोरडेपणा वगैरे कमी असणे तसेच कफदोषाचे संतुलन असणे अर्थात वजन वगैरे व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याचदा असे बघण्यात येते की ज्यांचे वजन खूप कमी असते किंवा शरीरात खूप कोरडेपणा जाणवत असतो त्यांच्यात पाळीसंबंधित तक्रारी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. रसधातू संपन्नतेसाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेता येऊ शकते.

1) बऱ्याच स्त्रिया घरात दूध फक्त लहान मुलांसाठीच वापरतात. परंतु स्त्रियांची ताकद टिकून राहण्याच्या दृष्टीने त्यांनी कोणतीही प्रक्रिया न केलेले नैसर्गिक दूध घेणे आवश्यक असते. स्त्री संतुलन कल्प, शतावरी कल्प किंवा अनंत कल्प टाकून दूध घेणे अधिक उत्तम.

2) नियमित फळे खाणे, फळांचा रस घेणे हेही रसधातूसाठी पोषक असते.

3) वाढत्या वयात वातअसंतुलन कमी करण्यासाठी शरीर आपसूक थोडे कफवृद्धीकडे जात असते. त्यामुळे या वयातील स्त्रियांमध्ये थोड्या प्रमाणात वजन वाढण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच शरीरात रसधातू व्यवस्थित राहील या दृष्टीने शरीराला नियमितपणे तेल लावणे उत्तम. संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे किंवा संतुलन ओबेसॅन तेलासारखे तेल स्त्रियांनी नियमितपणे शरीराला लावणे चांगले.

4) आहारात फॅटस्, प्रोटिन, कॅल्शिअम, या सगळ्यांची पूर्ती होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आहारात रोज ४-५ चमचे साजूक तूप, अक्रोड, काजू, खजूर वगैरे सुका मेवा, पालक, मेथी, दुधी, कोहळा वगैरेसारख्या रस-रक्तधातूपोषक भाज्यांचा आवर्जून समावेश करावा. गहू, चांगल्या प्रतीचे तांदूळ, नाचणी, जव, वगैरे धान्ये, जवस, लाल भोपळा,कलिंगड, चिया वगैरेंच्या बियांचाही समावेश नक्की असावा.

5) गर्भाशयाचे आरोग्य टिकून राहण्याच्या दृष्टीने संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या एखाद्या सिद्ध औषधी तेलाचा पिचू तसेच संतुलन शक्ती धुपासारख्या वनस्पतींच्या मिश्रणापासून तयार केलेली आयुर्वेदिक धुरी योनीभागी वापरणे नियमित सुरू करावे.

6) गर्भाशयाबरोबरच स्तनांची काळजी घेणे सुद्धा आवश्यक असते. संतुलन सुहृद तेलासारखे औषधी तेल स्त्रियांना नियमितपणे हलक्या हातांना स्तनांवर चोळावे.

7) बरोबरीने दिनचर्येमध्ये संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत, धात्री रसायन, सॅन रोझ, मॅरोसॅन वगैरेंसारखे रसायन घेतले जाते आहे याची काळजी घ्यावी.

8) स्त्रीसंतुलनाच्या दृष्टीने योगासने व चालणे अत्यंत महत्त्वाचे असते. रोज न चुकता किमान ३० मिनिटे चालणे, १० मिनिटे प्राणायाम, संतुलन क्रियायोगातील संतुलन समर्पण, संतुलन अमृत, संतुलन फुलपाखरू या क्रिया करणे उत्तम.

9) स्त्री संतुलनाच्या दृष्टीने श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी स्त्री संतुलन हे स्वास्थ्यसंगीत नियमित ऐकण्याचा सल्ला दिलेला आहे. दिवसातून थोडा वेळ काढून आपली नेहमीची कामे करत असताना किंवा वेळ असल्यास शांत बसून स्त्री संतुलन हे स्वास्थ्यसंगीत प्रत्येक स्त्रीने नियमित ऐकावे.

10) वयोपरत्वे बदल जाणवू नये अशी इच्छा असल्यास किंवा बरेच बदल जाणवत असल्यास वेळ काढून शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचाही फायदा होतो.

11) उत्तरबस्ती करून घेतल्यास या काळात हॉर्मोन्समध्ये होत असलेले बदल टाळण्यास मदत होऊ शकते. उत्तरबस्तीसाठी कुठले द्रव्य वापरावे हे स्त्रीच्या प्रकृती व वयानुसार तज्ज्ञ ठरवतात.

मुलांचा सहभाग कसा मिळू शकतो?

  • आई रोज व्यवस्थित खात-पीत आहे की नाही याबद्दल मुले काळजी घेऊ शकतात.

  • न्याहारीच्या वेळी तिला संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत करून देणे, भिजवलेले ४-५ बदाम, भिजवलेले अंजीर तिच्या हातात देणे, तिला तूप घालून खजूर खायला देणे वगैरे काळजी मुले घेऊ शकतात.

  • शाळेतून येताना किंवा येता-जाता केव्हाही ताज्या भाज्या व फळे आणण्याची काळजी मुलांनी घेतली तर घरचा मेनू ठरविण्यात मुले एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

  • तिचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी या वयात बाहेरचे जेवण शक्यतो टाळणे इष्ट असते. त्यामुळे मुलांनी स्वयंपाकात मदत केली, बाहेरचे खाणे कमी केले तर आपसूक तिची तब्येत नीट राहायला मदत मिळू शकेल.

  • या वयात हॉर्मोन्सच्या बदलामुळे / रजोनिवृत्तीमुळे स्त्रीचे वजन वाढण्याची प्रवृत्ती असते. त्यासाठी मुले व घरातील इतर सदस्य सपोर्टिव्ह राहिले, तिला व्यायाम करायला, स्वतःची काळजी घ्यायला सवड दिली तर तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. मध्यमवयीन स्त्रियांचे वजन वाढू लागते तेव्हा मुले व घरातील इतर सदस्य तिला कमी खाण्याचा, व्यायाम करण्याचा सल्ला देतात असे बऱ्याचदा आढळते. यामुळे स्त्रिया अजूनच निराश होतात असे दिसते. रजोनिवृत्तीच्या काळात तिची दिनचर्या व खाणे-पिणे याकडे लक्ष ठेवल्यास ती या फेजमधून कुठलाही ताण न घेता बाहेर पडू शकेल.

  • रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रिया चिडचिड्या, रागीट व निराश झालेल्या दिसतात. मुलांनी व कुटुंबातील सदस्यांनी अशा वेळी तिला समजून घेतले, तिच्याशी संवाद साधला, तिला काय त्रास होतो आहे, तिला मदत कशी होईल याकडे लक्ष दिले, ती चिडल्यास वा रागावल्यास तिच्यावर उलटी चिडचिड करण्यापेक्षा तिच्या चिडचिडीचे व रागाचे कारण समजून तिला थोडी मदत करणे जास्त इष्ट ठरेल.

  • गाडीत प्रवास करत असताना आईसाठी स्त्री संतुलन वा स्पिरीट ऑफ हार्मनी हे स्वास्थ्यसंगीत लावू शकतात. तिला चांगली प्रेरणादायक पुस्तके वाचायला आणून देऊ शकतात.

  • आठवड्यातून १-२ तिच्या पायाला तेल लावून देणे, तिला पादाभ्यंग करून देणे हे मुलांनी स्वतःच्या कामांमध्ये अंतर्भूत करणे शक्य असते.

  • मदर्स डेच्या दिवशी केक आणून किंवा ग्रीटिंग कार्ड देऊन ‘मदर्स डे’ साजरा करण्यापेक्षा वरच्याप्रमाणे विचार करून तिची काळजी घेतली तर तिची कुटुंबरक्षणाची ताकद किती तरी पटीने वाढू शकेल. तिच्या आरोग्याची जाणीव तिच्या बरोबर तिच्या घरच्या सदस्यांनी ठेवली, तिला कुठलाही आजार वा त्रास होण्याची वाट न पाहता आधीपासून स्त्रीसंतुलनासाठी अशा प्रकारे मदत केली तर हा मातृदिन खऱ्या अर्थाने साजरा केला असे आपल्याला म्हणता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.