शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलं आह. याच पुस्तकात राऊतांनी अनेक गौप्यसफोट केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावाही राऊतांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी संवाद साधाताना राऊतांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. मी 100 दिवस तुरूंगात होते, तेथील एकूण अनुभवाबद्दल लिहील्याचं राऊतांनी सांगितलं.यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलची एक सल देखील बोलून दाखवली.
मी तुरूंगात होतो, तेव्हा राज ठाकरेंनी एकदा फोन करायला हवा होता, असं राऊत म्हणाले. राज ठाकरे माझे मित्र होते. आमचे चांगले संबंध होते. राजकारण वेगळं असलं तरी अशावेळी घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा फोन जरी गेला तरी एक आधार वाटतो, की आपल्यासोबत कोणी तरी आहे. ज्या पद्धतीने आमच्यावर संकटाचा पहाड कोसळला होता, व्यक्तीश: नाही, कुटुंबावर. तेव्हा एक काडीचा आधार असतो. कुणी तरी फुंकर मारणं महत्त्वाची असते,तेव्हा राज ठाकरे यांनी एक फोन तरी करायला हवा होता असं म्हणत राऊत यांनी मनातील सल बोलून दाखवली.
मला जास्त बोलायला लावू नका
बाळासाहेब हे हिंदूहृदय सम्राट होते. न्यायामूर्ती, पंतप्रधान आणि राष्ट्रपती या सर्वांशी त्यांचे आदराचे संबंध होते. बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची. बाळासाहेब बोलणं हा प्रसाद आहे, असं ते मानायचे. माझ्या मर्यादेत जेवढं शक्य आहे, तेवढी माहिती मी दिली. मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा राऊत यांनी दिला.
बाळासाहेबांचा पक्ष लोफरच्या हातात
ठाकरे कुटुंबाने, मातोश्रीने मोदी-शहांवर एवढे उपकार केले. त्यांनी आमचा पक्ष फोडला याचं काही वाटत नाही. आमदार फुटले, गद्दार झाले. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणाच्या हातात दिली? तर एका लोफर माणसाच्या हाती दिली असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला. शिंदेंचं राजकारण त्यांच्यापाशी. पण त्यांना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता? तुम्ही कोण आहात? असा सवालही त्यांन विचारला. ज्या बाळासाहेबांनी किंवा ज्या शरद पवारांनी त्यांना चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष लोफर लोकांच्या हातात दिले, हे त्यांना शोभलं नाही. त्यामुळे चिडून मी लहानसा संदर्भ दिला. मी या विषयावर कधी बोललो नाही. लिहिलं नाही. उद्धव ठाकरेही कधी बोलले नाही. काही गोष्ट गोपनीय असतात. आम्ही कधीच बोललो नाही. या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही. पण त्या ओघात हा प्रसंग गेला असं राऊत यांनी स्प्ष्ट केलं.