जा आणि शरद पवार यांना भेटून विचारा..; संजय राऊतांचा आधी महागौप्यस्फोट, नंतर विरोधकांना फटकारलं
GH News May 16, 2025 02:09 PM

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकात देशाच्या राजकारणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा राऊतांनी या पुस्तकात केला आहे. यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, अनेक गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, असं ते पत्रकारांसमोर म्हणाले. “तुम्ही कुठे होता तेव्हा? हा बोलतोय, तो बोलतोय, नुसते पोकळ दावे… अरे तुम्हाला काय माहीत आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला. मी लिहिलेल्या दोन्ही घटना 100 टक्के खऱ्या आहेत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारलं आहे.

पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, “शरद पवारसाहेब असतील, बाळासाहेब असतील.. या महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांचा मदत करण्याचा जो स्वभाव आहे, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही नेत्यांचे पक्ष कसे फोडले आणि माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टाहास केला, हा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड ही कशी अपकाराने केली. आता हे भाजपवाल्यांचं ऐकतायत. त्यांना काय माहीत आहे? तुम्ही कुठे होता तेव्हा? हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे… अरे तुम्हाला काय माहीत आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला. मी लिहिलेल्या दोन्ही घटना 100 टक्के खरे आहेत. या पेक्षाही जास्त काही मी लिहू शकलो असतो. मग फार हाहाकार माजला असता. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या आहेत आणि संयम ठेवला आहे.”

“यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या आहेत आणि त्याला मी साक्षीदार आहे. तुम्हा सर्वांना हे नाकारता येणार नाही. मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांसोबत राहिलेला माणूस आहे. त्यामुळे यांना अनेक वेळा बाळासाहेबांनी केलेली मदत आणि घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे, असं मला नेहमी वाटतं. पण मी त्या कधीच लिहिणार नाही. पण नरकातला स्वर्ग वेगळा प्रवास आहे. तुरुंगातील एकांतात जेव्हा आपण तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, तेव्हा अनेक गोष्टी, जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावं लागत नाही,” असं ते म्हणाले.

संजय राऊतांचं हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शाहांची कशाप्रकारे मदत केली होती, याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.