आयपीएल 2025 स्पर्धेतून माघार घेणं या खेळाडूला पडलं महागात, झालं असं की…
GH News May 16, 2025 06:13 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचा प्लेऑफची उत्सुकता शिगेला ताणली गेली आहे. 17 मे पासून सुरु होणाऱ्या उर्वरित टप्प्यात सात संघांची प्लेऑफसाठी चुरस असणार आहे. पण एका आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित झाल्याने फ्रेंचायझींचं गणित बिघडलं आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे अनेक विदेशी खेळाडूंनी काढता पाय घेतला. काही खेळाडूंनी स्थिती निवळली असली तर परत येण्यास नकार दिला आहे. काही खेळाडू राष्ट्रीय संघाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे फ्रेंचायझींची ऐनवेळी कोंडी झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयने नियम बदलत तात्पुरत्या खेळाडूंची निवड करण्याची मुभा दिली आहे. दुसरीकडे, काही विदेशी खेळाडूंवर त्यांच्या बोर्डाने कोणताही दबाव टाकलेला नाही. मात्र तरीही खेळण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत बीसीसीआयने दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. यासाठी विदेशी खेळाडूंना मोठी रक्कम मोजावी लागू शकते.

मिचेल स्टार्कने भारतात येण्यास नकार दिला

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत मायदेशी गेला. मात्र उर्वरित सामन्यांसाठी न परतण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीला उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याचं कळवलं. मिचेल स्टार्कने यासाठी 4 लाख डॉलर म्हणजेच 3.5 कोटी रुपयांवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, एखादा खेळाडू आयपीएल स्पर्धा पूर्ण खेळला नाही तर त्याचं मानधन कापण्याचे अधिकार आहे. असा आयपीएलचा नियम आहे. या नियमामुळे मिचेल स्टार्कचे मानधन कापलं जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने मिचेल स्टार्कसाठी मेगा लिलावात 11.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. आता स्टार्कला या रकमेतून 3.5 कोटींवर पाणी सोडावं लागेल.

मिचेल स्टार्कचं आयपीएल 2025 मधील कामगिरी

मिचेल स्टार्कने आयपीएल 2025 स्पर्धेत एकूण 11 सामने खेळला. यात त्याने 10.16 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. तसेच 14 विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कने एका सामन्यात तर पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे मिचेल स्टार्कने भारतात न येण्याचं कळवल्याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर दिल्ली कॅपिटल्सला उर्वरित तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे त्याची उणीव संघाला भासणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.