पुणे: राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेसाठी सर्व घडामोडींचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे, निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे, या संदर्भात सविस्तर आढावा फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आहे. तर, आपल्या 105 जागा भाजपकडे कायम राहणार आहेत. थोडक्यात गेलेल्या जागांवर महायुतीमध्ये चर्चा केली जाईल. आपण महायुती म्हणून लढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू, तर निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसारच होतील असं फडणवीस या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलं आहे. महायुतीसाठी पुणे मनपा अपवाद ठरणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुणे भाजपला 105 नगरसेवकांचं टार्गेट दिलं आहे, तर पुणे मनपात एकूण 166 जागा आहेत.
2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या 105 जागांवर भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दावा ठोकला आहे. त्यामुळे जरी पुण्यामध्ये महायुतीची चर्चा झाली, तर या 105 जागा सोडून पुढील जागांवर चर्चा करण्यात येईल असा सूचक इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे संभाव्य 166 नगरसेवकांपैकी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 105 जागांवर भाजपने दावा ठोकल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना हा फॉर्मुला मान्य असणार का? यावर पुण्यातील संभाव्य महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
काल(शुक्रवारी) पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी अपवाद असू शकतात. त्या ठिकाणी आमच्यात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ. एकमेकांवर टीका न करता, जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यानंतर पुण्यात मुक्कामी असणाऱ्या फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना 105 जागांवर तयारी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता फडणवीसांचा हा फॉर्म्युला महायुतीतील इतर घटक पक्षांना मान्य होणार?, की जसं फडणवीस म्हणाले होते की अपवादात्मक ठिकाणी एकत्र लढता येणार नाही त्यानुसार हे अपवादात्मक ठिकाण पुणे असणार याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे..
पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे माध्यमांना माहिती देताना म्हणाले, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी मोठ्या प्रमाणावर गेली पाहिजे. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे, या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही आता 105 नगरसेवक आहोत. या 105 जागा निवडून येणार हे आमचं प्राथमिक लक्ष आणि तयारी असणार आहे, या संदर्भातील निर्णय आहे तो वरिष्ठ नेते घेतील. मात्र, आता आम्ही भाजप म्हणून आमच्या ज्या-ज्या भागात नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येण्याच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्याचबरोबर जो काही फॉर्म्युला असेल तो प्रदेश स्तरावर ठरेल. आमचे काही नगरसेवक कमी अधिक फरकाने पडलेले होते, त्या जागांवर ही आम्ही तशी तयारी करता येईल मतांचा गणित आणि जुळवाजुळ करता येईल याची रचना करत आहोत. परंतु जे नगरसेवक मागच्या 2017 च्या निवडणुकीत विजय झाले त्या सर्व जागा पुन्हा येऊन येतील असा विश्वास आहे. स्वबळावर किंवा युतीत लढायचं हा निर्णय प्रदेश स्तरावर होईल आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून तयारीला लागलो आहोत असेही पुढे धीरज घाटे यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=ib7ffsi_afq
अधिक पाहा..