सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १३ हजार ९१८ जणांनी स्वत:हून पक्के घर नसल्याची नोंदणी आवास योजनेच्या पोर्टलवर केली आहे. तर ग्रामसेवकांनी केलेल्या सर्व्हेत जिल्ह्यातील ४८ हजार ६८२ कुटुंबांना राहायला पक्का निवारा नसल्याचे समोर आले आहे. त्यात अक्कलकोट व पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक कुटुंब आहेत. राहायला पक्के घर नसलेल्या मागासवर्गीयांसह अन्य बेघर कुटुंबियांना नावनोंदणीसाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूरसह राज्यभरातील बेघर लाभार्थींना हक्काचे घरकूल मिळणार आहे.
देशातील, राज्यातील प्रत्येक बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतरही योजना सुरू आहेत. बेघर लाभार्थींचा नव्याने सर्व्हे करून त्या कुटुंबांना देखील घरकूल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ३० मेपर्यंत गावागावातील बेघर, कच्चे घर असलेल्यांचा सर्व्हे केला जात आहे. जूनमध्ये बेघर म्हणून नोंद झालेल्या प्रत्येकाच्या घराची स्थळ पाहणी होईल. त्यानंतर त्या यादीचे ग्रामसभेत वाचन होणार आहे.
त्यावरील हरकती, आक्षेपावर सुनावणी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या लाभार्थींना आवास योजनेतून घरकूल दिले जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार बेघर लाभार्थींचे अनुदान आता दोन लाख रुपये केले आहे. त्यातील १५ हजार रुपये घरावरील सौर पॅनेलसाठी आहेत. अनुदान वाढीचा सर्वाधिक लाभ हातावरील पोट असलेल्या मागासवर्गीय बेघर कुटुंबियांना होणार आहे. त्यांच्यासाठी रमाई, शबरी, पारधी आवास योजना आहेत.
तालुकानिहाय बेघर कुटुंब
तालुका बेघर कुटुंब
अक्कलकोट १०,३३८
बार्शी ५,०१३
करमाळा ४,२७९
माढा ५,२५५
माळशिरस ६,४७३
मंगळवेढा ४,३८७
मोहोळ ४,३४३
पंढरपूर ११,४७५
सांगोला ४,९०२
उत्तर सोलापूर २,३५९
दक्षिण सोलापूर ३,७७६
एकूण ६२,६००
बेघर लाभार्थींचा ३० मेपर्यंत सर्व्हे
जिल्ह्यातील एक लाख पाच हजार बेघर कुटुंबापैकी ६२ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थींनाही हक्काचा निवारा मिळेल. याशिवाय जिल्ह्यात नव्याने केलेल्या सर्व्हेत ६२ हजारांहून अधिक कुटुंब बेघर तथा पक्की घरे नसल्याचे समोर आले आहे. त्यात मागासवर्गीय लाभार्थी अधिक आहेत.
- रतिलाल साळुंखे, समन्वयक, ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर
बोगस लाभार्थींची नावे वगळली जाणार
अनेकांनी बेघर असल्याची नोंदणी करताना मुलांपासून किंवा आई-वडिलांपासून विभक्त राहत असल्याचे सांगितले आहे. काहींना गावात घर आहे, पण शेतात घर बांधायचे आहे. त्यामुळे सध्या बेघर असल्याची नोंद केलेल्यांची पडताळणी करून खोटी माहिती दिलेल्यांची नावे वगळली जाणार आहेत.