अटॅक येऊन मरून जाईल, नाही तर आत्महत्या करावी लागेल, बडा नेता मातोश्रीत रडला; राऊतांच्या पुस्तकात काय?
GH News May 17, 2025 08:07 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाने राजकीय वादळ निर्माण केलं आहे. या पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारचा धाकदपटशा, ईडी, सीबीआयच्या नोटिसांमुळे विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांचं गळालेलं आवसान आणि त्यानंतर झालेले पक्षांतर यावर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच कोठडीतील अनुभवावरही या पुस्तकात लिहिलं गेलं आहे. ईडीची नोटीस आल्याने अटकेच्या भीतीने ठाकरे गटाचा एक नेता कसा हतबल झाला होता, मातोश्रीत तो कसा रडला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेही कसे हतबल झाले होते याचा प्रसंग या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.

ईडीची प्रतिमा तपास यंत्रणेपेक्षा भाजपच चालवत असलेली दहशतवादी संघटना अशीच झाली होती. त्यामुळे अनेकांनी घाबरून भाजपमध्ये उड्या मारल्या होत्या. रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते. उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटचे ते एक सदस्य होते. त्यांचा मातोश्रीवर राबता असे. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह पक्ष सोडला तेव्हा ते शिंदेंसोबत गेले नाहीत. पण किरीट सोमय्यांनी अचानक वायकरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. रायगडमधील जमिनीवर नऊ बंगले बांधल्याचा फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवला. हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत असे भासवले. खोटे गुन्हे नोंदवले. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला. याच गुन्ह्यांचा आधार घेत त्यात ईडीला घुसवण्यात आले, असं संजय राऊत यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

वाघ समजत होतो, शेळ्या निघाल्या

वायकर यांना ईडी अटक करणार असा धुरळा सोमय्यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची गाळण उडाली. वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडले. माझ्यात तुरुंगात जायचे बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचे धैर्यदेखील नाही, असं वायकर यांनी मातोश्रीत सांगितलं. मला अटॅक येऊन मी मरून जाईल, नाहीतर आत्महत्या करावी लागेल. तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर मरेन, अशी निराशा आणि निर्वाणीची भाषा वायकरांनी सुरू केली. तेव्हा उद्धव ठाकरेही हतबल झाले होते. कालपर्यंत ज्यांना वाघ समजत होतो, ते प्रत्यक्षात शेळ्याच आहेत हे त्यांना पटले, असं राऊत यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

अखेर वायकर पक्ष सोडून गेले

अखेर वायकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात गेले. त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणू त्यांच्यावरील दबाव होता, असं सांगतानाच प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील अशा अनेकांनी अटकेच्या भीतीने उड्या मारल्या. सरनाईक यांच्यावर ईडीने धाडसत्र सुरू केलेच होते, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.