…तर PMLA कायद्यात बदल करावा लागेल, शरद पवारांचं मोठं विधान!
GH News May 18, 2025 12:05 AM

Sharad Pawar On PMLA Law : खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे मुंबईत मोठ्या थाटामाटात प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली. राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात तुरुंगातील आठवणी तसेच सरकारने सूडभावनेपोटी कशी कारवाई केली, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. हेच औचित्य साधून शरद पवार यांनी पीएमएलए कायद्यात दुरूस्ती करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. या कायद्यातील तरतुदीमुळे सत्ताधारी पक्षाला एखाद्याला उद्धवस्त करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले.

ईडीसारख्यांना दिलेल्या शक्तीमुळे…

शरद पवार म्हणाले की, राज्य येतं जातं, निवडणुकीत विजय होतो किंवा पराभव होतो. पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्शवादी असली पाहिजे. ही व्यवस्था ईडीसारख्यांना दिलेल्या शक्तीमुळे निर्णय घेण्याला मर्यादा येत असतील तर बदलाची किती आवश्यकता आहे, याची खात्री आपल्या सर्वांना पटते.

दुरुपयोग करण्याची संधी आपण…

तसेच,  संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहून फार मोठं काम केलं. सत्तेचा गैरवापर सतत केला जातो. हा दुरुपयोग करण्याची संधी आपण राज्यकर्त्यांना दिली. यातून मुक्त होण्याचं काम करण्याबाबत विचार करावा लागेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

सत्ताबदल झाला तर पहिलं काम हे…

हे पुस्तक वाचल्यावर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने देशात परिवर्तन केलं तर ईडी कायद्याचा आधार घेऊन एखाद्याला उद्ध्वस्त करायचा राजकीय पक्षांना जो अधिकार मिळाला आहे, तो बदलावा लागेल. सत्ताबदल झाला तर पहिलं काम हे करावं लागेल. त्यासाठी काय करावे लागेल ते करणं आवश्यक आहे. यात लक्ष देण्याची गरज असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.