कर्जतमधील पाच दरडप्रवण गावांची पाहणी
esakal May 18, 2025 02:45 AM

कर्जतमधील पाच दरडप्रवण गावांची पाहणी
अधिकाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद

कर्जत, १७ (बातमीदार) : तालुक्यातील दरडग्रस्त भागांतील जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रांत अधिकारी वैभव संकपाळ यांच्या उपस्थितीत मुद्रे बुद्रुकसह पाच गावांमध्ये भौगोलिक पाहणी करण्यात आली.
कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मुद्रे येथील कचेरी डोंगर, उमरोळी ग्रामपंचायतीमधील पाली वसाहत, नेरळमधील आल्याची वाडी, खांडपे ग्रामपंचायतीमधील सांगवी येथे पाहणी करण्यात आली. लवकरच तुंगी येथेही शिष्टमंडळ पाठवले जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरालगतच्या भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रांत अधिकारी वैभव संकपाळ यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पाहणी केली. मुद्रे बुद्रुक परिसरात इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
२००५ मध्ये मुद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन अनेक घरांचे नुकसान झाले होते. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. गावातील काही घरे मोडकळीस आली असून बंद अवस्थेत आहेत. कर्जत शहरातील मुद्रे येथील ‘कचेरी डोंगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचे प्रांताधिकारी वैभव संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार सचिन राऊत, नगरपालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, सर्कल अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

पुनर्वसनाबाबत कार्यवाहीत दिरंगाई
जीएसआच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, घरमालकांना धोक्याची सूचना दिली असून, आपत्ती काळात त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पुनर्वसनाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. ३० जुलै २०१४ रोजी माळीण गावात दरड कोसळून १५१ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनेही राज्य प्रशासन हादरले होते. जीएसआयच्या सूचनांवरून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली असली तरी पुनर्वसनाची ठोस कार्यवाही आणि संरचनात्मक उपाययोजना याकडे अद्याप दुर्लक्षच होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.