बेकायदा सावकारीला लगाम
esakal May 18, 2025 02:45 AM

मनोर, ता. १७ (बातमीदार) ः गरजू लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन चक्रवाढ दराने व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारांविरोधात पालघरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अनुषंगाने गुरुवारी बोईसर शहरातील सावकारांच्या घरावर छापे मारण्यात आले.
बोईसर शहरातील भीमनगर येथील सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि उमरोळी गावातील अमोल नारखेडे सावकारीतून गरजू लोकांची पिळवणूक सुरू असल्याची तक्रार पालघरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे आली होती. या तक्रारीनुसार निबंधक कार्यालयाने गोपनीय माहिती काढण्यात आली होती. या वेळी सागर करनकाळे, कपिल करनकाळे आणि अमोल नारखेडे सावकारीचा बेकायदा व्यवसाय करीत असल्याचे आढळले. या माहितीच्या आधारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी विठ्ठल आवुलवार यांनी गुरुवारी पोलिस बंदोबस्तात उमरोळीतील अमोल नारखेडेच्या घरी तसेच सागर, कपिल करनकाळेच्या भीमनगर येथील घरावर छापा मारला. या कारवाईत विविध दस्तऐवज, अभिलेख जप्त करण्यात आले आहेत.
----------------------------
कर्जदारांचा छळ केल्याचे उघड
- झडतीत आढळलेली कागदपत्रे आणि तक्रारीनुसार अमोल नारखेडे, सागर करनकाळे आणि कपिल करनकाळे याने कर्जदाराविरोधात शारीरिक इजा, दहशत, धमकी, मानसिक दबाब आणि छळ करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
- सहकार अधिकारी निबंधक विठ्ठल आवुलवार यांच्या फिर्यादीनुसार अमोल नारखेडे, सागर करनकाळे, कपिल करनकाळेवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४चे कलम ३६,४१ (सी),४५/४८ नुसार पालघर, बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
--------------------------------------
बेकायदा सावकारी करणाऱ्यांविरोधात सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
- अजय गुजराथी, सहाय्यक निबंधक, पालघर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.