नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : एपीएमसीमधील पुनित कॉर्नरजवळच्या पार्किंगमध्ये अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १६) दुपारी अटक केली. दिनेश रमेश सालियन (३७) व शिवम दयाशंकर सिंग (२६) अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले चार लाखांचे एमडी, चरस आणि हायब्रिड गांजा आणि त्यांची दुचाकी जप्त केली.
एपीएमसीमधील पुनित कॉर्नरलगतच्या झोपडपट्टीसमोरील पार्किंगमध्ये दोन व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेलार व त्यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी पुनित कार्नरलगतच्या परिसरामध्ये सापळा लावला होता. या वेळी दिनेश सालियन व शिवम सिंग हे दोघेही एका दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. येथील त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
------------------
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी दोघांची तपासणी केली असता, दिनेश सालियन याच्याजवळ तीन लाख रुपये किमतीचे २९ ग्रॅम वजनाचे एमडी सापडले; तर शिवम सिंग याच्याजवळ ६५ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचा हायब्रिड गांजा आणि २८ हजारांचा १४ ग्रॅम वजनाचा चरस सापडला. पोलिसांनी या दोघांकडे सापडलेले अमली पदार्थ आणि त्यांची दुचाकी जप्त करून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांची २० मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.