कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा,
असे कोणाला छंद कोकिळेचा
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा!
ही कविता लिहिली आहे दत्तप्रसाद कारखानीस यांनी, पण आपल्या मुत्तूचंही अगदी हेच म्हणणं होतं! मुत्तूचाही होता एक कोंबडा मित्र-गूंदी! मुत्तू आणि गूंदी! गूंदी आणि मुत्तू! दोघं अगदी जिवाभावाचे मित्र होते. त्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे. एक मुत्तू शाळेत गेल्यावरचा वेळ सोडला, तर ते सतत एकमेकांसोबत असत. मुत्तूच्या हातात असतं, तर ती गूंदीला तिच्या पोन्नेरीच्या शाळेत सुद्धा घेऊन गेली असती. तेवढीच तिला शाळा सुसह्य झाली असती. हो, कारण तिला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही!
‘तळ्ळी निल्ल! जा तिकडे! आंघोळ करत नाहीस का तू?’ मुत्तू शंका विचारायला गेली की, अंजली मिस नाक आक्रसून फिसकन तिच्यावर खेकसायच्या.
‘आमच्या गावात अंघोळीची खोली नाही मिस!’
‘मग तुझ्या अम्माला सांग तुझ्याकरता शोधून काढायला!’
अम्माचा उल्लेख झाल्यावर मुत्तू गप्पच व्हायची. अम्माला सांगायला ती होतीच कुठे?
तिच्या कुळतमेड गावात मासेमारी करणारे इरुला कोळी राहायचे. तिचं हे गाव होतं तमिळनाडू राज्यात. रोज पहाटे मुत्तूचे आजोबा - ताता इतर गावकऱ्यांसोबत कट्टुमरम (झाडाची चार-पाच खोडं एकत्र बांधून तयार केलेली होडी) आणि खांद्यावर मासे पकडायच्या जाळीसह समुद्रावर जात असत. मुत्तू तातांना माशांचं जाळं तयार करायला मदत करत असे.
जाळ्याला वजन यावं म्हणून तळाशी लहान दगड, गोटे बांधायचे असतात नाही तर पाण्याच्या जोरामुळे जाळं वर तरंगायला लागतं आणि सगळे मासे पुन्हा पाण्यात पळून जातात हेसुद्धा तिला माहीत होतं. शाळेचा कंटाळवाणा दिवस संपला की तातांच्या हातचं माशांचं झणझणीत कालवण आणि भात खाणं मुत्तूला खूप आवडायचं.
अशा तिच्या छोट्याच्या विश्वात गूंदी मात्र नेहमी मुत्तूची सोबत करायचा. काही वेळा मुत्तू त्याला कडेवर उचलून घ्यायची! एवढंच नाही तर मुत्तू आणि गूंदी ठिकरीचा खेळसुद्धा खेळत! गूंदी पंख पसरून अचूकपणे चौकोनाच्या अगदी मधोमध उडी मारायचा. हां, आता तो चौकोन बऱ्याचदा चुकीचा असायचा, पण मुत्तू त्याला जिंकू द्यायची. जिंकल्यावर त्याला पिसं फुलवून नाचताना पाहून ती खूश व्हायची!
गूंदी मुत्तूचा बेस्ट फ्रेंड असला, तरी तो होता सेल्वी पाटी नावाच्या एका बाईच्या मालकीचा. लवकरच गावचा मुखिया - तलैवर हा सेल्वी पाटीकडून गूंदीला विकत घेणार होता. ही गोष्ट तातांना म्हणजे मुत्तूच्या आजोबांना ठाऊक होती. त्यांनी मुत्तुलाही ही गोष्ट सांगितली आणि ते म्हणाले, ‘‘तू गूंदीला एवढा जीव लावू नकोस.’
मुत्तुला वाटलं की, एवढं मोठं कोंबड्यांचं खुराडं असताना, त्यात एवढे कोंबडे- कोंबड्या असताना गूंदीची त्याला काय गरज? आता तलैवर मुखियाच्या मुलाच्या लग्नाच्या मेजवानीसाठी गूंदीचा विचार केला जातोय असं तिला सांगणार कसं? आजोबांनी काही बाही कारण देऊन वेळ मारून नेली, पण तेवढ्यात मुत्तू म्हणाली, ‘मग आपणच घेऊया गूंदीला विकत!’ आपल्या नातीची ही इच्छा पैशाअभावी आपण पूर्ण करू शकत नाही हे जाणवून ताता दुःखी झाले.
गूंदीला आनंदाने कडेवर घेतलेली मुत्तू आणि तिला छानपैकी बिलगून बसलेला गूंदी, ठिकऱ्या खेळणारा गूंदी, मासेमारीसाठी एकमेकांच्या खांद्यावर बसून जोडीने समुद्रात जाणाऱ्या बायका, इरुला लोकांचं जीवन आणि मुत्तूचं भावविश्व यांची अतिशय लोभस चित्र काढलीयत फिदा हमीद यांनी.
समुद्रकिनाऱ्यावरच्या कट्टुमरमवर बसलेली मुत्तू, तिच्या हातातला गूंदी सूर्यास्त बघताहेत हे मुखपृष्ठ फारच सुंदर आहे! ही गोष्ट लिहिलीय अदिती राव यांनी आणि याचा मराठी अनुवाद केला आहे शर्मिला फडके यांनी. हे तुलिका प्रकाशनाचं पुस्तक आहे.
गूंदीला तलैवरापासून वाचवण्यासाठी आता मुत्तुलाच काहीतरी करावं लागणार होतं! आयडिया! सकाळ झाली! ताता मासेमारीसाठी समुद्रावर गेले होते. शेजारी सेल्वा पाटीची झोपडीही रिकामीच दिसत होती. तीसुद्धा नेहमीसारखी समुद्रावरच गेलेली होती. आज मुखियाचा माणूस गूंदीला न्यायला येणार होता.
इकडे-तिकडे बघत मुत्तूने हळूच गूंदीला उचललं, आपल्या शाळेच्या दप्तरात भरलं आणि तिने धावत बस स्टॉप गाठला. गूंदीला हे काय चाललय कळेना. त्याला मुत्तूच्या धसमुसाळेपणाचा जरा रागच आला. बस मध्ये नीट जागा पकडून मुत्तूने तिचं आणि गूंदीचं तिकीट काढलं! दिवस संपला, संध्याकाळ झाली, तरी गूंदीचा काही पत्ताच नाही पाहून सेल्वी पाटीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली.
रात्री जेवण आटोपल्यावर आसपास कोणी नाहीसं पाहून, मुत्तूने गूंदीला दप्तरातून बाहेर काढलं आणि सेल्वी पाटीच्या मागच्या अंगणात नेऊन ठेवलं, तेवढ्यात मागे ताता येऊन उभे राहिले. मुत्तूला वाटलं आता आपल्याला चांगलाच ओरडा बसणार पण ताता हसून म्हणाले, ‘त्याला तिथे ठेऊ नकोस. गूंदी आता तुझा आहे!’
‘काय? गूंदी माझा? खरंच?’
‘हो! ही तुझ्या अम्माने तुला दिलेली भेट आहे, कन्ना पोरी!’
झालं असं होतं की, आजोबांना मुत्तू आणि गूंदी यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, त्यांची मैत्री ठाऊक होती. गूंदी गेल्यावर मुत्तूचं काय होईल? हा विचारच त्यांना करवेना. त्यांनी आपल्या लेकीची, म्हणजे मुत्तूच्या आईची सोन्याची नथनी मुत्तूसाठी जपून ठेवली होती. जमिनीच्या आत थोडसं खणून तिथे ती सुरक्षित होती.
ती नथनी त्यांनी काढली आणि विचार केला, ‘मुत्तूला नथनी आवडेल की गूंदी?’ मुत्तू आणि गूंदी खेळतानाचे कित्येक हसरे क्षण तातांच्या नजरेसमोर तरळून गेले. उत्तर अर्थातच स्पष्ट होतं. तातांनी मुत्तूला असं ‘सरप्राइज’ दिलं! मुत्तूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता!
ही गोष्ट वाचताना तुम्हालाही तुमच्या आयुष्यातला गूंदी आठवला का? सोन्याहून अधिक मौल्यवान असा एखादा मित्र किंवा मैत्रीण? मग आज लगेच त्याला ही गोष्ट पाठवायला हवी, तो किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी हे त्याला सांगायला हवं, सूर्यास्त पाहण्यासाठी त्याला घेऊन जायला हवं! जमलंच तर कुळतमेड गावात जाऊन मुत्तू आणि गूंदीला एकदा भेटून यायला हवं!