ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
पुणे-मुंबईच्या प्रवासादरम्यान तळेगाव दाभाडे लागते. गावात शिरलो की तळेगाव-चाकण या रस्त्यालगत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान’ अशी कमान दिसते. डॉ. बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४८ रोजी तळेगाव येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला हा बंगला खरेदी केला होता. या खरेदीमागे त्यांचा एक उदात्त आणि ध्येयवादी विचार होता. या परिसरात त्यांना तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठांसारखे एक विद्यापीठ उभारायचे होते. ते विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण झाले नाही; पण नेहमीच शिक्षणाची कास धरणाऱ्या प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पवित्र वास्तूची दारे आज गरजू, गरीब, अनाथ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी अभ्यासिकेच्या रूपाने सताड उघडी ठेवली आहेत.
असे म्हणतात, की एखाद्या गावाचे मोठेपण हे महान व्यक्तींच्या वास्तव्यावर ठरत असते. कारण त्या गावाला अशा महापुरुषांचा सहवास तर लाभतोच; पण त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सुगंधही तिथल्या वातावरणात मिसळून गेलेला असतो आणि हा सुगंध येणाऱ्या प्रत्येक पिढीला ऊर्जितावस्थेत ठेवत असतो. थोडक्यात अशा महापुरुषांनी वास्तव्य केलेली ठिकाणे म्हणजे केवळ दगडमातीची ‘निवासस्थाने’ बनत नसतात, तर ती ‘वारसास्थळे’ ठरत असतात. असेच एक ठिकाण जे की पुणे जिल्ह्यातीलच असणाऱ्या तळेगावच्याच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुक्याच्या नावलौकिकात भर घालणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर! भारताच्या या महामानवाचा सहवास ज्या भिंतींनी अनुभवला ती वास्तू प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवी.
मुळात अशी ठिकाणे पाहणे ही आपली भटकंती खऱ्या अर्थाने समृद्ध करीत असतात. अशा जागा पाहून परतताना आपण एक प्रकारची श्रीमंती बरोबर नेत असतो. जुन्याजाणत्या लोकांना हे ठिकाण बऱ्यापैकी माहीत आहे; पण नवीन पिढीला याबाबत फारशी माहिती नाही. अनेकजण नोकरी, व्यवसाय, शिक्षण, उद्योग-धंद्याच्या निमित्ताने पुणे-मुंबई असा प्रवास करीत असतात. याचदरम्यान तळेगाव- दाभाडे हे पुण्याचे उपनगर लागते. काहीशी वाट वाकडी करून गावात शिरलो, की तळेगाव-चाकण या रस्त्यालगत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान’ अशी पाटी आणि कमान दिसते. अशी कमान लावल्यामुळे उत्सुकतेपोटी काही पावले निश्चितच या वास्तूकडे वळू लागली आहेत. आपणही या कमानीतून आत शिरायचे. एरव्ही रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वास्तू आहे, हे ध्यानीमनीही नसते; पण जेव्हा आपण या वास्तूसमोर येतो तेव्हा मात्र आपल्याला एक सुखद धक्का बसतो.
हा सारा परिसर तळेगाव स्टेशनचा. येथीलच हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गसुंदर जागेत डॉ. आंबेडकरांचे घर उभे आहे. घराचा मूळ साचा कायम ठेवून या वास्तूचे संवर्धन केल्याचे दिसते. त्यामुळे वास्तूच्या मूळ सौंदर्याला धक्का बसलेला दिसून येत नाही. बंगल्याभोवती असणारी फळझाडे आणि हिरवळीत हा बंगला सजला होता. मोठे अंगण व एका कोपऱ्यात बाबासाहेबांच्याच साक्षीने खोदलेली विहीर बंगल्याची शोभा कैकपटीने वाढवत होती. व्हरांडा, प्रशस्त हॉल, स्वयंपाक घर, दोन मोठ्या खोल्या, स्नानगृह, स्वच्छतागृह तसेच बाबासाहेबांनी वापरलेले मोठे लाकडी टेबल आणि कपाटेही या बंगल्यात अजूनही पाहायला मिळतात. बंगल्यात शिरताक्षणीच एका भिंतीवर चितारलेले म्युरल मनाचा ठाव घेते. याव्यतिरिक्त हॉलमधील लगतच्या खोलीत बसवलेली गौतम बुद्धांची धातूची मोठी मूर्ती पाहिल्यावर प्रसन्न वाटते. बाबासाहेबांनी वापरलेले टेबल, खुर्च्या या व्यवस्थित मांडून ठेवलेल्या दिसतात. या सर्व खोल्यांमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची सचित्र मालिका तर आवर्जून पाहण्यासारखी आहे. भारताची राज्यघटना डॉ. राजेंद्र प्रसाद यांचेकडे सुपूर्द करताना, कायदा-मंत्रिपदाची शपथ घेताना, पुणे करार, कुटुंबासमवेत निवांत क्षणी असताना आदी बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक घटना तसबिरीच्या रूपाने पाहताना अंगावर रोमांच येतात. हे सारे अभ्यासपूर्ण पाहणे येथे भेट देणाऱ्यांसाठी एक मोठी पर्वणीच आहे.
सध्या आजूबाजूला बऱ्याच इमारती, घरे उभी झालीत, त्यामुळे कदाचित आजच्या पिढीला त्या वेळी असणारे वर्णन माहीतदेखील नसणार; पण हे ठिकाण होते मात्र खासच! टेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत व आजूबाजूच्या झाडीत हा सारा परिसर न्हाऊन निघाला होता आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने या ठिकाणाचे भाग्यच पालटून गेले.
तो काळ साधारण १९४९ ते १९५४चा! या कालावधीत या बंगल्याने बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि विचार अनुभवले. तसे पाहिले तर संपूर्ण मावळ तालुक्याचेच बाबासाहेबांना मोठे आकर्षण होते. सह्याद्रीच्या कणखर कुशीत पहुडलेल्या या मावळच्या भागाचा लोहगड, तुंग, तिकोणा, राजमाची या गडकोटांच्या साक्षीने झालेला इतिहासही याला कारणीभूत होता. यापेक्षाही हजारो वर्षांपूर्वी येथल्या कातळात खोदलेल्या कार्ला- बेडसे- भाजेसारख्या बौद्ध लेण्यांनी मंतरलेला हा चैतन्यमय परिसरसुद्धा तितकाच हवाहवासा होता. तळेगावजवळच असलेल्या आळंदी आणि देहू या संतांच्या भूमीने आणि त्यांच्या भूमिकेने इथल्या मातीची वैचारिक मशागतही केलेली असल्यामुळेच बाबासाहेबांचे लक्ष या भूमीकडे न गेले तरच नवल होते. शैक्षणिक चळवळीसाठी आणि समतेचे बीज पेरण्यासाठी रस्ते आणि लोहमार्ग अशा दळणवळणाच्या सोयींनी युक्त अशी ही तळेगावची भूमी योग्यच होती, अशी बाबासाहेबांना खात्री होती. यावर अनेक अभ्यासक आणि इतिहासकार यांच्यातसुद्धा हेच मत आहे आणि याच उद्देशाने डॉ. बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४८ रोजी तळेगाव येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या अल्टीनो कॉलनीतील हा बंगला जागेसहित क्लीमेंट बरूख ऑफीक या पारशी गृहस्थाकडून खरेदी केला.
वैयक्तिक संपत्ती संचयासाठी नव्हे तर या जागेच्या खरेदीमागे बाबासाहेबांचा एक उदात्त आणि ध्येयवादी विचार होता. तो म्हणजे एकेकाळी भारतात शिक्षणवैभवाने शिखरावर असणाऱ्या तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठांसारखे एक विद्यापीठ इथल्या मातीत उभरायचे होते. त्यामुळेच त्यांनी याव्यतिरिक्त एकूण ६५ एकर जागाही वडगाव व कातवी या गावांच्या लगत खरेदी केली आणि एक महामानव तळेगावचा रहिवासी झाला. तळेगावच्या नावलौकिकात मोठीच भर पडली; पण त्यांचे विद्यापीठाचे स्वप्न दुर्दैवाने पूर्ण झाले नाही.
बंगल्याच्या तत्कालीन खरेदी आणि देखभाल करणाऱ्यांत तळेगाव येथील लिंबाजी गायकवाड, त्यांचे पुत्र दत्तोजी, लिबाजींच्या पत्नी काशीबाई या नेहमी बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या काळात वात्सल्याने बरोबर असत. काशिबाईंच्या हातचे पिठले, भाकरी, वांग्याचे भरीत, डाळीची आमटी हे तर त्यांच्या आवडीचे. बाबासाहेब तळेगाव मुक्कामात आले की याची चव आवर्जून चाखली जाई. जेव्हा जेव्हा बाबासाहेब तळेगावात येत, तेव्हा कार्यकर्त्यांचे, पाहुण्यांचे, अभ्यागतांचे मोहोळ त्यांच्या अवतीभोवती जमे आणि आपोआपच तिथे विचारांची शाळा भरे. त्या वेळी ते सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगत, की ‘‘जगात साऱ्या प्रकारच्या क्रांत्या होत राहतील. धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती होईल; पण मी सांगतो की पायाभूत क्रांती केवळ शैक्षणिक क्रांतीच करू शकते. जसजसा शिक्षणाचा प्रचार होईल, तसा वर्णभेद-जातीभेद या गोष्टी कमी होतील आणि मला या भूमीत नेमकं हेच घडवायचं आहे.’’ किती तेजस्वी विचार होते बाबासाहेबांचे. हे सारे या वास्तूने अनुभवले.
या साऱ्यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो एका प्रसंगाचा. या बंगल्याने एक सुवर्णदिन अनुभवला. तो म्हणजे १४ एप्रिल १९५१ रोजीचा. या दिवशी बाबासाहेबांचा ६०वा वाढदिवस या बंगल्याने पाहिला. त्यामुळे लोकांची अभूतपूर्व गर्दी या बंगल्याने अनुभवली.
या बंगल्यात बाबासाहेबांबरोबरच त्यांच्या पत्नी माई व मुलगाही येत असत. या सर्वांच्या कौटुंबिक प्रेमाचा ओलावा या भितींना पाहायला मिळाला. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच समाजाला जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणानेच प्रगती होऊ शकते, असे या महामानवाचे मत होते.
आपल्यातून माणूस निघून गेला की त्याच्या मृत्युपश्चात वास्तूंचे स्मारक करण्याची प्रथा आहे. येथेही बाबासाहेबांचे अनोखे स्मारक उभे राहिलेय... ते म्हणजे शिक्षणाचे. नेहमीच शिक्षणाची कास धरणाऱ्या बाबासाहेबांच्या या पवित्र वास्तूची दारे गरजू, गरीब, अनाथ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी अभ्यासिकेच्या रूपाने सताड उघडी ठेवली आहेत. आपण या वास्तूत गेलो की ही मुले या पवित्र वास्तूत अभ्यास करताना दिसतात. अशी ही वास्तू मुलांच्या शैक्षणिक वापरासाठी खुली असते. बाबासाहेबांना यापेक्षा चांगली आदरांजली दुसरी कुठलीही नसेल...