चंडीगड : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून हरियानातील महिला यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा असे या महिलेचे नाव असून, ती तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आली आहे.
ज्योती हिस्सारची रहिवासी आहे. ती प्रवासावर आधारित यूट्यूब चॅनेल चालविते. या महिलेचे यूट्यूबवर तीन लाख, तर इन्स्टाग्रामवर एक लाख ३१ हजार फॉलोवर आहेत. पाकिस्तानच्या प्रवासासह दुबई व अन्य काही देशांतील प्रवासाचे व्हिडिओ तिने या चॅनेलवर टाकले आहेत. ज्योती २०२३मध्ये पाकिस्तानला जाणार होती, त्यावेळी व्हिसा घेण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली असता अहसान-उर-रहीन उर्फ दानिश या अधिकाऱ्याशी तिची ओळख झाली. दानिशच्या ओळखीतील अली नावाच्या व्यक्तीने ज्योतीच्या पाकिस्तानच्या प्रवासाची व तेथील फिरण्याची व्यवस्था केली.
या काळात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे काही अधिकारीही तिला भेटले. तेथून परतल्यानंतर व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या मदतीने ती त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तसेच, ती बाली येथेही जाऊन आली असून, तेथेही ती एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटली असण्याचा संशय आहे. तिच्या सोशल मीडिया प्रभावाचा वापर करून, पाकिस्तानविषयी जाणीवपूर्वक सकारात्मक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. ज्योतीला हेरगिरीसाठी उद्युक्त करणाऱ्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दानिशला १३ मे रोजी देश सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत.
सहा जणांना अटक
ज्योती मल्होत्रासह कैथल, पानिपत आणि नूह येथूनही पोलिसांनी तरुणांना अटक केली आहे. हरियाना व पंजाब पोलिसांनी आतापर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे, असे सांगण्यात आले. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून गुप्तहेरांचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करण्यात येत आहे.
दोन संशयित दहशतवादी अटकेतमुंबई : इंडोनेशियाहून भारतात परतलेल्या ‘इसिस’च्या दोन संशयित दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. अब्दुल्ला फय्याज शेख आणि तलहा खान अशी त्यांची नावे आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ‘एनआयए’ या दोघांच्या मागावर होती. त्यांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ‘एनआयए’ने केलेल्या दाव्यानुसार फय्याज आणि खान ‘इसिस’च्या पुण्यातील स्लीपर सेलचे सदस्य आहेत. त्यांच्या आठ साथीदारांना याआधी अटक करण्यात आली होती; मात्र हे दोघे देशाबाहेर पसार होण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याविरोधात जारी केलेल्या लूक आउट नोटीसमुळे मुंबई विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढे ‘एनआयए’ने दोघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी गेल्या दोन वर्षांपासून इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात दडून बसले होते. फय्याजने २०२२-२३ मध्ये पुण्यातील कोंढवा भागात एक खोली भाड्याने घेत तेथे बॉम्ब तयार करण्याचे प्रयोग आरंभले. या समूहाची ही कृती दहशतवादी कृत्य घडवून देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या, सामाजिक अस्थिरता आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने प्रेरित होती. फय्याज आणि त्याच्या साथीदारांनी तयार केलेल्या बॉम्बची चाचणीही (मर्यादित स्वरूपात) घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोघांनी समूहात सहभागी अन्य तरुणांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू केले होते, असे ‘एनआयए’कडून सांगण्यात आले.
दोघांविरोधात अटक वॉरंट जारी‘एनआयए’ने यापूर्वी गुन्हा नोंदवून ‘इसिस’च्या पुणे मॉड्यूलमध्ये सहभागी आठ तरुणांना अटक केली होती. याप्रकरणी फय्याज आणि खान यांचा शोध सुरू होता. त्यांच्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. ‘एनआयए’ने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून या दोघांसह एकूण १० आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. या दोघांची अटक दहशतवादविरोधी विशेषतः इसिसविरोधी लढ्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. हे दोघे इसिसचे म्होरके, अन्य साथीदारांच्या संपर्कात असावेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून इसिसच्या परदेशातील आणि देशांतर्गत हालचालींची महत्त्वपूर्ण, संवेदनशील माहिती हाती लागू शकते, असा विश्वास ‘एनआयए’कडून वर्तविण्यात येत आहे.