नैक्रेत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १७) संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. अरबी समुद्रातून प्रवेश करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरू असून, गुरुवारी (ता. १५) दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरिन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केली होती.
शनिवारी (ता. १७) मॉन्सूनने आणखी चाल केली आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, केरळातील आगमनाची प्रतीक्षा आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेतपूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. २२) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.