वृक्षवल्ली आम्हा सोयरी...
esakal May 18, 2025 09:45 AM

- विश्वास वसेकर, saptrang@esakal.com

मराठवाड्याला संपन्न निसर्गसौंदर्य लाभलेले नसले, तरी असंख्य झाडांच्या आठवणी या मातीत जन्मल्यापासून माझ्या मनात गजबजलेल्या आहेत. आपण होतो, त्या आधी झाडे होती, आपण नसू तेव्हाही झाडे असतील. झाडांना माणसांपेक्षा तिप्पट-चौपट आयुष्य असतेही, तेव्हा दीर्घायुष्य आणि अमरत्व या दोन्ही बाबतीत झाडे माणसांपेक्षा श्रेष्ठ म्हटली पाहिजेत.

माझी झाडाची पहिली आठवण अमरत्वाच्या हव्यासापायी मी त्याला केलेल्या जखमेची आहे. नऊ-दहा वर्षांचा असेन मी तेव्हा. गावी बस येत नसल्याने जिंतूर-हिंगोली मार्गावरच्या चिंचोली या स्थानकावर जावे लागायचे. बस यायची तीदेखील प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर. एका झाडाखाली बैलगाडी सोडलेली असे. तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी जवळच एक ओढा. ना हॉटेल, ना वस्ती.

मोठा कंटाळवाणा तो कालखंड. अशा मनःस्थितीत एका वडाच्या झाडावर चढून एका फांदीवर दगडाच्या अणीदार चिपलंगीच्या सहाय्याने मी माझे नाव कोरले. मौज अशी की, ते नाव चार-सहा महिन्यांनी पाहण्याचा योग यायचा, तेव्हा दर वेळी ते मोठे मोठे होत गेलेले दिसायचे. आपले नाव अशा रीतीने एका झाडावर कोरलेले आहे आणि वाढते आहे याचा मला त्या कोवळ्या वयात मोठा अभिमान वाटायचा.

माझ्या आठवणीतले आणखी जुने झाड आहे - पारिजातकाचे. आजी चातुर्मासात महादेवाला फुलांची लाखोली वाहायचे व्रत करायची. अंगणातल्या वृंदावनासमोरचा मोठा दगडी महादेव देवघरात चार महिने ठेवला जायचा. आजी फुलांसाठी मला पिटाळायची. पितळेची फुलारी घेऊन मी गावातले सगळे पारिजातक गाठायचो. सकाळच्या वेळी त्याच्या फुलांचे सारवण खाली पडलेले असायचे.

त्याच्या लाल दांडीला हळुवार धरून एकेक फूल फुलारीत ठेवायचे. बोटांऐवजी हातांनी ढकलीत त्यांना गोळा करण्याचा प्रयत्न केला की, ते स्वर्गीय सौंदर्य आणि मुलखाचा नाजुकपणा लाभलेले फूल लाभायचे नाही. मग पुन्हा बोटांनीच उचलायचे. खालची फुले संपली की, झाड गदगद हलवायचे. लाख फुले वेचताना कंटाळा म्हणून यायचा नाही.

त्याचा मंद, खानदानी सुगंध नाकात असायचा आणि रूपडे डोळ्यांना सुखावणारे. जसजसा हिवाळा येई तसतशी फुले आणि त्यांचे पडणे कमी व्हायचे. घरी एका वहीत हिशेब लिहून ठेवावा लागायचा. तो आकडाही लाखावर जात असे. तुळशीच्या लग्नापर्यंत महादेव पुन्हा मूळपदावर पोहोचे आणि पारिजातकाच्या आठवणी वर्षासाठी निरोप घेत.

आजीमुळे लक्षात राहिलेले आणखी एक झाड म्हणजे वडाचे. वटपौर्णिमला आई, काकी आणि सगळ्या सुवासिनी वडाची पूजा करायला जात, तो सोप्याजवळचा प्रचंड वड तर लक्षात आहेच, पण त्याहीपेक्षा ठसायचा, तो दोन खणांच्या रूंदीएवढ्या सुंदर, गुळगुळीत अशा मातीच्या भिंतींवर आजीने काढलेला वड.

नैसर्गिक वडासारखा प्रभावशाली, हिरवागार वड. त्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आजी मला रेडा आणि यमदूत काढू द्यायची, पण तिच्या सुंदर चित्रकलेजवळ माझे हे ध्यान काढताना तेव्हाही मला लाज वाटायची. मात्र, आजी कौतुक करायची. ‘सत्यवानाच्या गळ्यात फास जरा जोरानेच आवळला’ म्हणायची. मी आणखी लाजायचो. हे सगळे त्या वटवृक्षासमोर चालायचे.

काही झाडे एकेकटी फारशी भेटलीच नाहीत. आंबराई, जांबवाडी अशी समूहानेच भेटली. त्यातही त्यांच्या फळाच्या हंगामात त्यांच्या झाडपणाकडे लक्ष जाण्यापेक्षा फळे चोरून पळ काढण्यावर भर अधिक असायचा. रखवालदार असताना अतिशय चलाख योजना आखून आंबे किंवा पेरू पळवण्यातली आमच्या मित्रांना वाटणारा थरथराट काही औरच होती. आज फळे विकत घेताना ती अजून बालपणीच्या त्या साहसांची आठवण करून देत गालातल्या गालात हसत असल्याचा भास होतो.

बालपणी फुप्फुसात भरभरून साठवलेले असेच काही झाडांचे गंध मनातून जाता जात नाहीत. पांड्याच्या वाड्याच्या पिछाडीला टाकळणीची दाट झाडे कुंपणासारखी लावलेली होती. त्यांच्या फुलांचा गंध वगळून बालपण आठवणे अशक्य आहे. आणखी एक विचित्र गंधसंवेदना लक्षात आहे, ती सीताफळीच्या फुलांची.

आषाढी एकादशीला शेजारच्या शहापूरच्या महादेवाच्या दर्शनाला आजी-आजोबांसोबत जायचो, तेव्हा वाटेत सीताफळांची खूप झाडे कुंपणासारखी लावलेली दिसायची. त्याच्या फुलांचा उग्र गंध मनात शिरून बसला तो कायमचा.

ज्याला सुगंध म्हणता येणार नाही अशी आणखी एक गंधसंवेदना आहे - बाभळीच्या शेंगांपासून कपाळाला लावण्यासाठी तयार केलेल्या काळ्या गंधाची. चवीला वाईट, पण गंध सुगंधी असा कडुनिंब आणि त्याचा बहर असाच स्मृतिकोशात जतन करून ठेवला गेला आहे तोही याच वयात.

आंब्याच्या हंगामात नाना प्रकारचे आंबे खाण्याचा आनंद जेवढा मोठा त्याहीपेक्षा त्याच्या कोयी खेळणे मोलाचे. कोयींचा मौसम संपला की टोईंचा खेळ सुरू व्हायचा. टोई म्हणजे मोहाच्या सुंदर, चोपड्या, लाल रंगाच्या बिया. त्यांची आवक कमी, म्हणून मोलही मोठे. मोहाचा आणखी एक मोह एकदाच तरुणपणी झाला आणि रात्रभर हात-पाय वाकडे झाल्याने या झाडाला कायमचे हात जोडले.

बालपण अनेक संदर्भांना पळवून आपल्यापासून जाते आणि तारुण्य नवे संदर्भ घेऊन येते. तारुण्यात मी क्रांतिकारी, विद्रोही कवी व्हायच्या प्रयत्नात होतो. त्यामुळे माझे नवे आवडते झाड झाले गुलमोहराचे. त्याचा दहा महिन्यांचा हिरवेपणा जेवढा गडद तेवढाच दोन महिन्यांचा भगवा वणवा आकर्षक, त्यानंतर कवी, लेखकांनी गुलमोहरावर अत्याचार करायला मोठ्या प्रमाणात आरंभ करण्यापूर्वी आपण त्याच्यावर एक चांगला ललितनिबंध आणि एकच कविता लिहून बिचाऱ्याला मोकळे केले आणि पुन्हा कधी वाटेस गेलो नाहीत, या स्वतःच्या सहिष्णुतेचे मला कौतुक वाटते. वारंवार प्रेमात पडण्यामुळे गुलाबालादेखील फार तसदी द्यावी लागली. परंतु, तेव्हा खरोखरच नाइलाज होता आणि नाइलाजाला काय इलाज?

तारुण्यातच साहित्याची आवड वाढत राहिली आणि त्यातून चिरपरिचित झाडांची नवनवी रूपे लक्षात यायला लागली. पळस आणि वडाच्या झाडांशी पोपटाच्या रंगाची बहिणाबाईंनी जी समतानता शोधली ती वाचून रोमहर्षित झाल्याचे आठवते.

हिरवी हिरवी पानं

लाल फळ जशी चोच

जणु वडाच्या झाडाले

आलं पीक पोपटाचं

वा! काय बहारदार कल्पना आहे. नुसत्या पोपटचोचीच्या आकाराची पळसाची फुले पाहून बहिणाबाईंना प्रश्न पडतो, आपल्या चोची झाडावर ठेवून हे राघू कुठं बरं गेले?

झाडांवरील प्रेमाची खरी परीक्षा होती स्वतःच्या मालकीच्या घरात आणि सभोवती झाडे लावताना. मी स्वतःच्या आवडी-निवडींबाबत तीव्र भावना असलेला माणूस आहे. इंग्रजीत ज्याला ‘च्यूझी’ म्हणतात असा, प्रत्येक स्वीकाराच्या प्रसंगी मी असतो.

त्यामुळे आपल्या मालकीच्या छोट्याशा तुकड्यात काय लावायचे? आणि काय नाही? याबाबत मी अत्यंत जागरूक, सतर्क आणि चोखंदळ होतो. साहित्यातून अनुभवलेल्या झाडांचे अमीट ठसे सोबत होतेच. त्यांचादेखील स्वतःची बाग करताना फार परिणाम झाला.

इंदिरा संतांच्या कवितेमुळे मला मरवा आणि सायली तातडीने हवे होते. अनिलांच्या कवितेततली जुई आणि मख्दूमच्या शायरीतली चमेली (म्हणजे जाई) दोन्ही अत्यावश्यक होत्या. शायरीतली चमेली सुरेश भटांच्या कवितेतून प्रगटून आपल्या बागेतल्या जाईच्या पाकळ्यातदेखील दव सलायला पाहिजे.

सदाफुली एखाद्या झुडपाच्या मागे असल्याशिवाय वसंत बापटांवाली ‘सिच्युएशन’ निर्माण होणार कशी? ही विवंचना होती. नर्गिसची रोपे लावली, तरी सुंदर डोळ्यांच्या आकाराची फुले त्याला कभी येणार? या विचाराने अस्वस्थ होत तासनतास त्यांच्याकडे पाहात बसायचो.

उर्दू शायरीतल्या संगदिल प्रेयसीसारखी झाडेदेखील माणसाला छळतात बरं का! पिवळा बहावा उर्फ अमलतास हे माझे अत्यंत आवडते झाड. उन्हाळ्यात सोनेरी फुलांच्या घोसांनी ते लगडून गेलेले असते. म्हणूनच की काय त्याला ‘गोल्डन शॉवर’ असे नाव आहे. आपल्या दारात ते असावे म्हणून मी औरंगाबादहून त्याचे बी आणले.

दोन झाडे आलीदेखील, पण चारपाच वर्षे त्यांना फुले येण्याचा अंदाजच दिसेना. या झाडाचे माझे सहचरी भाव, धनंजय गुडदे नावाच्या माझ्या मित्राशी निगडित होते. आकस्मिक तो वारला, तेव्हा या झाडांपाशी मी दुःख व्यक्त केले. त्यातल्या एकाचे नावच ठेवले गुडदे. या नावाने त्याच्याशी संवाद साधू लागलो आणि आश्चर्य म्हणा किंवा योगायोग, त्या एकाच झाडाला नंतरच्या उन्हाळ्यात फुले आली. अमलतासाचा पहिला बहर असा सुखदुःखमिश्रित आहे.

बूच हे माझे आवडते फूलझाड. त्याचा प्रचंड वृक्ष होतो हे माहीत असूनही मी घराच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला चार-पाच फुटांवर बुचाची झाडे लावली. माझी झाडे लावून झाल्यानंतर एक रोप उरले, ते पश्चिमेकडील एका शेजाऱ्यास दिले. वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो हा स्वार्थ त्यामागे होताच, तर ते झाड फुलायला लागले त्यानंतर दोन वर्षे माझ्या झाडांना फुलेच नाहीत.

यावर्षी फुले आली आणि मी ‘बूचमहोत्सव’ साजरा केला. एका दुष्ट शेजाऱ्याने हे झाड घरात लावू नये असे सांगून माझ्या आनंदाला दृष्ट लावली. सुशील सुर्वे या वहिनींकडे हे गाऱ्हाणे घेऊन गेलो, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अहो, किती सुंदर झाड आहे ते. त्याला आकाशमोगरा म्हणतात. माझ्या कर्नाटकातल्या माहेरी मी त्याचे नाव ऐकले आकाशमल्लग. तिथून मराठीत हा शब्द आला असावा.’ मला बुचाचे हे नाव खूप आवडले - आकाशमोगरा.

आकाशमोगऱ्यावरून आठवला जमिनीवरचा मोगरा; परंतु छळणारा. मला वेल-मोगरा पाहिजे होता-ज्ञानेश्वरांच्या अभंगातला. त्या प्रमाणे इवलेसे रोप आणून मी लावले देखील; पण त्याचा वेल काही मांडवावर जाईना. काही दोष जमिनीचा असेल; पण आता मी ज्ञानेश्वरांचे ते रूपडे ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची आशा सोडून दिलीय.

झाडांच्या आठवणी संपणाऱ्या नाहीत. एक आठवण संज्ञा-प्रवाहावर वारंवार तरंगत येते. वसंत सावंत या आवडत्या कवीचा ‘स्वस्तिक’ हा पहिला संग्रह त्यांनीच मला एका साहित्य संमेलनात दाखवला. ‘चांदण्यात सुरूचे झाड कोसळावे अंगावर’ ही त्यांच्या कवितेतली ओळ पद्मा सहस्रबुद्धे या चित्रकर्तीने मुखपृष्ठावर जिवंत केली होती. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सुरूचे झाड. एकंदरीत पुस्तकही फारच देखणे झाले होते. मी खूश होऊन दाद दिली.

कवी म्हणाले, ‘वसेकर, सावंतवाडी हे निसर्गरम्य गाव माझं. त्या गावातल्या प्रत्येक झाडाला नेऊन मी माझं पुस्तक दाखवलं, ‘बघ ना, किती छान झालंय’ असं म्हणून.’ कवीच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून मी हरखून गेलो. त्यांच्या शब्दांनी, तर माझ्याही अंगावर चांदण्यात सुरूचे झाड कोसळते आहे अशी सुखद संवेदना मला झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.