जगण्याशी जोडलेली बालकविता
esakal May 18, 2025 09:45 AM

कवी इंद्रजित भालेराव हे लहानथोरांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले नाव आहे! त्यांच्या कविता जशा मोठ्या वाचकांना आवडतात, तितक्याच त्या लहानांनाही भावतात. कवितेची आणि वाचकांचीही नस त्यांना सापडली आहे. बालवाचकांना अभ्यासक्रमात असलेल्या भालेराव यांच्या कविता तोंडपाठ असतातच; पण अभ्यासक्रमात नसलेल्या त्यांच्या कविताही तोंडपाठ असतात.

कारण कविता म्हणून त्यांच्या कविता श्रेष्ठ असतातच पण मुलांपर्यंत या कविता फार सुंदर पद्धतीने ते पोहोचवतात. नुकतीच त्यांची बालकवितेची तीन पुस्तके ‘रानमळ्याची वाट’, ‘गाणे गोजिरवाणे’ आणि ‘नातूऋतू’ प्रकाशित झाली आहेत. बालवाचकांचा विचार करून लिहिलेली आणि दर्जेदार निर्मिती असलेली ही पुस्तके पाहताक्षणी नजरेत भरतात.

मराठी बालसाहित्य हे प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय अथवा निसर्ग किंवा अद्भुतता आणि काल्पनिकतेवर आधारित होते. ते असावेही. पण पहिल्यांदा भारतीय संस्कृतीशी आणि इथल्या मूळ कृषिसंस्कृतीशी मराठी बालकवितेला जोडण्याचे काम भालेराव यांच्या बालकवितेने केले आहे.

अद्भुतता, अतिरंजकता, अनाकलनीय कल्पनाविलास आणि वास्तवाशी फारकत घेतलेल्या मराठी बालकवितेला इथल्या जगण्याशी जोडण्याचे काम भालेराव यांची ही बालकविता करते. सुंदरता आणि निरागसता हे या कवितेचे अविभाज्य अंग आहे. भालेराव यांच्या बालकविता मातीचा सुगंध घेऊन आणि ग्राम जीवनाशी एकरूप होऊन येतात आणि म्हणूनच मुलांना त्या वाचताक्षणीच आवडतात.

पहिल्या बालकविता संग्रहात गावाची छान, मजेशीर आणि महत्त्वपूर्ण सफर कवींनी घडवून आणली होती. आता ‘रानमळ्याची वाट’ या नव्या संग्रहात रानावनाची उत्कंठावर्धक आणि रम्य अशी सफर ते घडवून आणतात. एकूण बावीस कवितांमधून सगळा रानमळा बारीकसारीक गोष्टींसह वाचकांसमोर उभा करतात.

रानमळ्याच्या वाटेने एकदा मळ्यात प्रवेश केला की मग तिथे आपल्याला भेटतात वेगवेगळी झाडे, पाऊस, पक्षी, ओढा, बैलगाडी, गाय, शेळीचे पिल्लू, मळ्याची माती, रानमेवा वगैरे. कविता वाचता वाचता आपण या कवितांशी कधी एकरूप होऊन जातो आणि प्रत्यक्ष रानळ्यातच फिरत राहतो हे आपल्यालाही कळत नाही. ‘गाय’ या कवितेत गाईचे शेतकऱ्यांच्या आयुष्यातले महत्त्व तर अधोरेखित होतेच; पण नादमधुर व लयबद्ध शब्दरचनेमुळे कविता मुलांना वाचताक्षणी तोंडपाठ होऊन जाते.

मुलांना गोष्टी खूप आवडतात. ‘रानमळ्याची वाट’ या संग्रहामध्ये काही कथाकाव्य समाविष्ट केले आहेत. बालमित्र, चिमुकला गोंधळी, भाऊ हरपला, मोराचे पाय या कवितांमध्ये खूप सुंदर अशा गोष्टी आहेत. त्या एका लयीत मांडलेल्या आहेत. त्यामुळे या कविता मुलांना खूपच आवडतील अशा आहेत. बालकवितेमध्ये कथाकाव्य हा दुर्मीळ प्रकार आहे. तो इथे भालेराव यांनी सहजपणे वापरलेला आहे.

‘नातूऋतू’ या संग्रहात इंद्रजित भालेराव यांनी त्यांचा नातू नरेन याच्याविषयी कविता लिहिलेल्या आहेत. जरी या कविता स्वतःच्या नातवाबद्दल लिहिलेल्या असल्या तरी त्या कविता कुठल्याही नातवाला किंवा कुठल्याही बाळाला सहज लागू पडतील अशा कविता आहेत. एखादे बाळ वाढत असताना घरातील प्रत्येक जण त्या बाळाची प्रत्येक हालचाल टिपत असतो.

तसा एक-एक क्षण टिपून या कविता भालेराव यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकालाच आपल्या घरातील बाळाविषयीच्याच कविता आहेत असे वाटते. अशी वैश्विकता कवितेत येणे महत्त्वाचे असते. ती भालेराव यांनी या कवितेत आणली आहे. त्यामुळे ही कविता फक्त त्यांच्या नातवाची राहत नाही; तर प्रत्येक नातवाची कविता होते.

खरे तर मुलांना आपल्या घरातील लहान बाळाविषयी खूप उत्सुकता असते. ते सतत त्याच्या आसपास घुटमळत असतात. या कविता बाळाशी संबंधित असल्यामुळे आणि आपण जे बाळामध्ये पाहतो तेच शब्दात रेखाटलेले असल्यामुळे या कविताही मुलांना खूप आवडणाऱ्या आणि आपल्या जवळच्या अशा वाटणाऱ्या आहेत.

तिसरा कवितासंग्रह ‘गाणे गोजिरवाणे’ हा कवीने संपादित केलेला कवितासंग्रह आहे. यामध्ये मुलांची लोकगीते संग्रहित केली आहेत. मराठीमध्ये मुलांसाठीची लोकगीते आहेत आणि ती खूप मजेशीर आहेत. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात आजच्या मुलांना ही लोकगीते माहिती नाहीत.

म्हणून हा संग्रह आजच्या मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. यामध्ये मुलांसाठीची पारंपरिक लोकगीते कवीने संग्रहित केली आहेत. एकूण ३१ लोकगीते या संग्रहामध्ये आहेत. ती खूप मजेशीर अशी आहेत.

मुलांच्या साहित्यामध्ये चित्रांचे खूप महत्त्वाचे स्थान असते. या तीनही संग्रहांना चित्रकार सरदार जाधव यांनी अप्रतिम अशी चित्रे काढली आहेत. मुलांना या कवितांशी सहजपणे जोडण्याचे काम ही चित्रे करतात.

अल्पाक्षरत्व, लय आणि सुंदर चित्रे यामुळे बालसाहित्य सकस होत असते. हे सर्व गुण भालेराव यांच्या कवितेमध्ये आहेत. मुलांचे मनोरंजन करणे, नकळतपणे मूल्य आणि ज्ञान देणे, भावनांचा विकास करणे, साहित्यातून समाजाशी जोडणे ही सर्व जर बालसाहित्याची वैशिष्ट्ये असतील, तर इंद्रजित भालेराव यांच्या या कवितांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत.

म्हणून त्यांची कविता मराठी बालसाहित्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या कविता जशा लहानांना आवडणाऱ्या आहेत, तशाच त्या मोठ्यांनाही आवडणाऱ्या आहेत. या वैशिष्ट्यांमुळे ही कविता मराठी बालसाहित्यात ठळकपणे उठून दिसते. ही तिन्ही पुस्तके प्रत्येक मुलांकडे संग्रही असावीत अशी आहेत.

पुस्तकाचे नाव - १. रानमळ्याची वाट २. गाणे गोजिरवाणे ३. नातूऋतू

कवी - इंद्रजित भालेराव

प्रकाशक - आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर. (संपर्क ८४४६७९६५५७ )

पृष्ठे - १२० (एकत्रित)

किंमत - ५०० रुपये (एकत्रित)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.