नवी दिल्ली : लहान मुलांकडून नेमके किती प्रमाणामध्ये साखरेचे सेवन केले जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या आहारातील साखर कमी करण्यासाठी केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांना ‘शुगर बोर्ड’ लावण्याचे निर्देश दिले आहेत. कधीकाळी प्रौढांमध्ये आढळून येणारा ‘टाइप-२’ मधुमेह आता लहान मुलांनाही होऊ लागल्याने तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मागील काही दशकांमध्ये या मधुमेहाच्या रुग्ण संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येते. लहान मुलांनाही हा आजार होऊ लागल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
शाळांच्या आवारामध्ये विपुल प्रमाणात गोड खाद्यपदार्थ, पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध होऊ लागल्याने विद्यार्थी देखील त्याचे मोठ्या प्रमाणावर सेवन करत असल्याचे दिसून येते. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे केवळ मधुमेहाचाच धोका वाढला आहे असे नाही तर त्यामुळे विद्यार्थ्यांमधील स्थूलत्व, दातांच्या समस्या आणि चयापचयाशी संबंधित आजार देखील बळावले आहेत. वारंवार आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मंडळाने विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात ‘शुगर बोर्ड’ लावण्याचे निर्देश दिले आहेत. मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा आणि विद्यालयांना कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे यांचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांच्या अनुषंगाने शाळांनी संक्षिप्त अहवाल आणि छायाचित्रे १५ जुलैच्या आधी अपलोड करणे अपेक्षित असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
कायदेशीर अधिष्ठानमुलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स’ या (एनसीपीसीआर) या घटनात्मक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ‘कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स (सीपीसीआर) ॲक्ट- २००५’ च्या कलम तीन अन्वये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून ज्या मुलांना सर्वाधिक धोका आहे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे अपेक्षित आहे.
‘शुगर बोर्ड’वर काय?मुलांना साखरेचे धोके सांगणार
रोज साखरेचे किती सेवन करावे
विविध पदार्थांमधील साखरेचे प्रमाण
गोड पदार्थांना इतर आरोग्यदायी पर्याय
आरोग्यदायी आहाराचे दीर्घकालीन लाभ
४ ते १० वर्षे - १३%
११ ते १८ वर्षे - १५%
११ ते १८ वर्षे - ५%