प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
मराठी भाषा जपताना मराठी खाद्यसंस्कृती जपणेदेखील महत्त्वाचे आहे. मराठी पदार्थ साधे आणि पौष्टिक असतात. गुजराती- मारवाडी- पंजाबी- दक्षिण भारतीयांनासुद्धा हे पदार्थ तितकेच आवडतात ही बाब अनेकदा दुर्लक्षित केली जाते. मराठी पदार्थ टिकवायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर गरज आहे ते आजूबाजूला उपलब्ध असण्याची. ‘त्रिमूर्ती’ स्वत:हून ही खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
आपल्याला हवं ते करायचं आणि त्याला ‘लोकआग्रहास्तव’ असं म्हणण्याची हल्ली फॅशन आहे. कोणत्याही गोष्टीचं फ्युजन करून चव, गंध, रंग, रूप नसलेले आणि खिशाला न परवडणारे पदार्थ बाजारात दाखल होतात, प्रयोगाच्या नावाखाली लोकांच्या गळी उतरवले जातात, हळूहळू लोकांना त्याची सवय लागते आणि मग ते पदार्थ नाईलाजाने बदल म्हणून स्वीकारले जातात. अशावेळी साधे पारंपरिक पदार्थ जास्त भावतात. कारण त्यामागे कसलीही लबाडी नसते. खरंच लोकांना जे हवंय ते द्यायचं, त्याचा कुठलाही गाजावाजा करायचा नाही, हे साधं तत्त्व पाळणं आजच्या व्यवहारी जगात अतिशय कठीण काम आहे; मात्र पनवेलच्या त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नरने अल्पावधीतच ही किमया साध्य करून दाखवली आहे. ताजे मराठमोळे पारंपरिक पदार्थ आणि त्याचे सर्वांना परवडतील असे दर ही ‘त्रिमूर्ती’ची खासीयत.
सहदेव पवार यांचा जन्म कोकणातल्या राजापूरचा. तिथेच शाळा-महाविद्यालयातील शिक्षण झाल्यानंतर १९८४ मध्ये सहदेव यांनी नोकरीसाठी मुंबई गाठली. सुरुवातीला मुंबईत एका कंपनीत शिपायाची नोकरी केली. त्यानंतर १९८६मध्ये पनवेल गाठलं आणि कायमचेच तिथलेच रहिवासी झाले. पनवेलमधील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली. तिथे पडेल ते काम करावं लागत असे. टेबल साफ करण्यापासून ते किचनमधील सर्व गोष्टी इथे त्यांनी शिकून घेतल्या. पंचवीस वर्षे तिथे काम केल्यानंतर सहदेव यांनी वय आणि अनुभवाच्या जोरावर स्वत:चा धंदा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
धंदा करायचा म्हटल्यावर जागेचा प्रश्न आला. त्या वेळी गुजराती माणसाने मदत केल्याचं सहदेव आवर्जून सांगतात. पनवेलमधील कपड्याचे व्यापारी यतिश सादराणी यांनी पनवेलच्या कापड गल्लीतील आपली जागा सहदेव यांना देऊ केली. आपल्या एका मित्रासोबत पार्टनरशीपमध्ये त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नरची सुरुवात केल्यानंतर अल्पावधीतच जुन्या पनवेलमधील लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. हॉटेलमध्ये येऊन खाणाऱ्या लोकांसोबतच पदार्थ पार्सल घेऊन जाणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. कोणत्याही धंदेवाल्यासाठी ही गोष्ट हुरूप वाढवणारी असते. लोकांना आपले पदार्थ आवडताहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन वर्षांतच व्यवसाय विस्तारण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई-गोवा महामार्गावरील शिरढोण येथे २०१४ साली नवीन शाखा सुरू केली. आजघडीला दोन्ही ठिकाणी खवय्ये ठरवून खाण्यासाठी गर्दी करतात.
मिसळ पाव, बटाटा वडा, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी, थालीपीठ, कांदे पोहे, कांदे पोहे रस्सा, उपमा, शिरा, फराळी मिसळ, वडा उसळ, समोसा या मोजक्या पदार्थांसोबत ताक, कोकम सरबत, पन्हे (उन्हाळ्यात), पियुष, चहा, कॉफी ही पेय, खरवस आणि पोळी-भाजी असा पाठांतर करता येईल इतकाच मेन्यू इथे आहे. प्रत्येक पदार्थ गरमागरम बनवूनच दिला जातो. त्यातील पोहे, उपमा, शिरा हे पदार्थ सकाळी अकरा वाजेपर्यंतच मिळतात.
मिसळ हा खूप संवेदनशील पदार्थ आहे. त्याची भट्टी नीट जमून आली नाही तर विचका होतो. त्रिमूर्तीची मिसळ इतर मिसळींपेक्षा निश्चितच वेगळी आहे. महत्त्वाचं म्हणजे ती स्टीलच्या वाडग्यात दिली जाते. त्यामुळे मिसळीतील जिन्नस व्यवस्थित एकजीव होतात आणि तर्रीसोबत पाव खायचा असल्यास तेही शक्य होते. कारण तर्री मागाल तितकी मिळते. पोह्याचा चिवडा, फरसाण, वाटाण्याची उसळ, मटकी, कांदा आणि त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर असते, सोबत लिंबाची फोड. फरसाणमध्ये पिवळी शेव आणि खारी बुंदी असते. ते बाजारातून विकत न घेता इनहाउसच तयार केले जाते. हे फरसाण तिखट नाही, त्यामुळे नमकीन फरसाण आणि तिखट तर्री हे कॉम्बिनेशन चांगले जमून येते. उसळीसाठी मूग, मटकी, चणे, मटकी-हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा अशी वेगवेगळी कडधान्ये वापरली जातात. तर्रीसाठी वापरला जाणारा मसाला बनवून घेतला जातो. वाटण दररोज केलं जातं आणि तिखटाचं प्रमाण बेताचं असल्याने शरीराला बाधक ठरत नाही. इथले पाव आकाराने लहान असले तरी मऊ आहेत. त्यामुळे मिसळ असो वा वडा तो खायला चांगला लागतो.
अनेकांना बटाटा वडा गाडीवर खायला आवडतो. कारण तिथे शेगडी पेटलेलीच असते. वडे कढईतून काढले जात नाहीत तोवर संपतात; पण हॉटेल असलं तरी इथे वडे गरमच काढून दिले जातात. वड्याची चव इतकी परफेक्ट आहे की नुसता खा किंवा पावासोबत काहीच फरक नाही. वड्यासोबत तिखट मसाल्याची भुकटीची कोरडी चटणी दिली जाते. समोसादेखील पातळ आवरणाचा असतो. त्यातील भाजीत हिरवा वाटाणा असतो. वडा, समोसा, कोथिंबीर वडी, साबुदाणा वड्यासोबत दिली जाणारी पातळ चटणी जरा वेगळी आहे. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला जातो. म्हणून हिरवी मिरची असली तरी त्याची चव तिखटाकडे न जाता त्यात थोडा गोडूसपणा असतो. त्यामुळे मुख्य पदार्थ संपला तरी चमच्याने चटणी संपवल्याशिवाय राहावत नाही. वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाताना ती पदार्थांची लज्जत वाढवत आपलं अस्तित्वही जपते.
चविष्ट आणि खुसखुशीत थालीपीठ बनवणे ही कला आहे. हॉटेलमधील थालीपीठ बहुतांशवेळा थेट तेलात तळली जातात, तरीही ती किती तळायची याचा अंदाज असेल तरंच त्याचा खरपूसपणा टिकून राहतो, अन्यथा ती करपतात किंवा कडक होतात. इथल्या थालीपीठाने ही परीक्षा पास केल्याचं दिसतं. भाजणी स्वत:ची असल्याने चवीबाबत कुठेही तडजोड होत नाही. शिवाय, पातळ थापलेले असल्याने खाताना पिठाळ लागत नाही.
भिंतीवरील स्नॅक्स पदार्थांच्या यादीतील शेवटचा पदार्थ पोळी-भाजी आहे. भाजी आणि तीन चपात्या दुपारच्या वेळेत मिळतात. दररोज वेगळी भाजी तयार केली जाते. मार्केटमधील भाज्यांची उपलब्धता आणि ऋतूनुसार भाज्या बदलत असतात. कामासाठी किंवा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांबरोबरच घरी पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
पन्हे, कोकम सरबत, पियुष ही पेय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक हॉटेलांमध्ये मिळतात; मात्र भरपूर अन्नसंरक्षके टाकलेली बाटलीबंद पेय असतात. त्रिमूर्तीमध्ये ही पेय दररोज किचनमध्ये तयार केली जातात. म्हणून इथे त्यांचा आस्वाद घेणं अनिवार्य आहे. मेन्यूमधील पदार्थांसोबतच पोह्याचा चिवडा, भाजणीची चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू हे फराळाचे पदार्थ अनेक वर्षांपासून तयार केले जात आहेत. फराळाचे असले तरी वर्षभर ते उपलब्ध असतात. ताटात पदार्थ मर्यादित स्वरूपात असला तरी एका माणसासाठी पुरेसा असतो. सर्व पदार्थ ताजे बनवले जात असल्याने पोट जड होत नाही. शिवाय किमती माफक असल्यामुळे वेगवेगळे पदार्थ चाखता येतात आणि खिशावरही भार पडत नाही.
माझ्या मराठीची शान, तिला अक्षरांचा मान, तिच्या संस्काराचे भान, काय वर्णावे...! हे कवी कुसुमाग्रजांचे शब्द त्रिमूर्तीच्या बाहेरील भिंतीवर रेखाटलेले दिसतात. मराठी भाषा जपताना मराठी खाद्यसंस्कृती जपणेदेखील महत्त्वाचे आहे. मराठी पदार्थ साधे आणि पौष्टिक असतात. गुजराती- मारवाडी- पंजाबी- दक्षिण भारतीयांनासुद्धा हे पदार्थ तितकेच आवडतात ही बाब अनेकदा दुर्लक्षित केली जाते. मराठी पदार्थ टिकवायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर गरज आहे ते आजूबाजूला उपलब्ध असण्याची. ‘त्रिमूर्ती’ स्वत:हून ही खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.