नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान किती लढाऊ विमाने गमावली, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केला आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या कथित वक्तव्याचा हवाला देत पाकिस्तानला हल्ल्यापूर्वी सरकारने माहिती का दिली, अशी विचारणाही त्यांच्याकडून करण्यात आली.
राहुल यांनी ‘एक्स’वर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची चित्रफीत जोडलेल्या पोस्टद्वारे केंद्र सरकारवर प्रश्नांची फैर झाडली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सुरुवातीला पाकिस्तानला संदेश देण्यात आला होता की दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात येत आहे. हा हल्ला सैन्यावर नसल्याने यात हस्तक्षेप न करता तटस्थ राहण्याचा पर्याय पाकिस्तानी लष्कराकडे आहे. मात्र त्यांनी हा सल्ला न ऐकण्याचा पर्याय निवडला, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर या चित्रफितीत बोलताना दिसतात. त्याआधारे राहुल गांधींनी म्हटले आहे की हल्ल्याच्या सुरुवातीस पाकिस्तानला माहिती देणे हा एक गुन्हाच होता.
भारत सरकारने हे केल्याचे (माहिती दिल्याचे) परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या मान्य केले आहे.यासाठी अधिकृतपणे कोणी मंजुरी दिली? त्यामुळे आपल्या किती लढाऊ विमानांचे नुकसान झाले? असे सवालही त्यांनी केले. दरम्यान या चित्रफितीसंदर्भात माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘पीआयबी फॅक्ट चेक’द्वारे आधीच स्पष्ट करण्यात आले होते की जयशंकर यांनी असे काहीही मान्य केलेले नसून त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे.