05427
मुलग्याच्या पाठोपाठ
वडिलांचेही निधन
सावर्डेच्या पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १७ : सावर्डे बुद्रुक (ता.कागल ) येथील तानाजी पांडुरंग पाटील (वय ४४) यांचे आज दुपारी निधन झाले. गुरुवारी (ता. १५)
माद्याळ हुडा - धामणे दरम्यान मोटारसायकलचा अपघात होऊन तानाजी पाटील यांचा मुलगा रितेश पाटील जागीच ठार झाला होता. मुलग्याच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी वडिलांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
गुरुवारी (ता. १५) दुपारी गडहिंग्लजला परीक्षेसाठी मोटारसायकलवरुन जाताना रितेशला अनोळखी वाहनाने ठोकरले होते. यामध्ये तो जागीच ठार झाला होता. मृतदेह रुग्णालयात आणताच तानाजी पाटील धाय मोकलून रडत होते. मुलग्याच्या निधनाचा जबर धक्का बसलेल्या पाटील यांना आज दुपारी घरी अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कागलला उपचारासाठी दवाखान्यात नेले. पण यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तानाजी पाटील खासगी कंपनीत नोकरी करत होते. रितेशचे रक्षाविसर्जन उद्या (रविवारी) होते. तोपर्यंत आज वडील तानाजी यांचे निधन झाल्यामुळे दोघांचे रक्षाविसर्जन एकत्र करण्याचा दु:खद प्रसंग पाटील कुटुंबावर ओढवला. त्यांच्या मागे आई, मुलगी, भाऊ, भावजय व पुतणे असा परिवार आहे.
कुटुंबावर काळाचा घाला..
मयत रितेशची आई व मावशी सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा होत्या. आठ वर्षांपूर्वी मावशी विजेच्या धक्क्याने तर आई कोरोना काळात मयत झाली होती. गुरुवारी रितेशचा अपघाती आणि आज वडील तानाजी यांचे निधन झाल्याने पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. तानाजी यांची मुलगी व आई दोघी घरी आहेत.