तुरुंगात कसबाचे भूत… अनेक रात्री जागून काढल्या, पण… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
GH News May 18, 2025 05:07 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. राऊत यांनी या पुस्तकातून तुरुंगातील जीवन, त्यांचे तुरुंगातील अनुभव आणि भूतकाळातील राजकीय घडामोडींवर तसेच पडद्यामागील घटनांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक राजकीय वादळ निर्माण करणारं ठरलं आहे. या पुस्तकात अनेक गमंतीजमती आहेत. तसेच तुरुंगातील विदारकता आणि अंधश्रद्धेलाही वाचा फोडण्यात आली आहे. अतिरेकी अजमल कसाब याचं तुरुंगातील भूत हे सुद्धा त्यातीलच एक प्रकरण आहे. तुरुंगात कसाबचं भूत कसं निघतं आणि त्याचा शोध घेण्यासाठी राऊत यांनी अनेक रात्री कशा जागून काढल्या याचा रंजक किस्साच या पुस्तकात आला आहे.

रुपेश कुमार सिंह हे लेखक आणि पत्रकार तुरुंगात होते. संजय राऊत यांची तुरुंगात रुपेश कुमार सिंह यांच्याशी भेट झाली. यावेळी रुपेश कुमार यांनी तुरुंगात अंधविश्वास असल्याचं सांगितलं. तुरुंगातील अंधविश्वास संपवण्याऐवजी तुरुंग प्रशासन तो वाढवण्यावरच अधिक भर देतं. कैद्यांना वाचायला पुस्तक मिळणं हा त्यांचा मौलिक अधिकार आहे. पुस्तके मिळत नाहीत. पण भुतं पळवण्यासाठी पूजा-पाठ करण्याच्या सामानाची व्यवस्था तुरुंगात केली जाते, असं रुपेश कुमार यांनी राऊत यांना सांगितलं होतं.

राऊत म्हणतात…

या पुस्तकात राऊत म्हणतात, हा अंधविश्वास आणि भूत-प्रेताच्या कहाण्या आर्थर रोडमध्येही धुमाकूळ घालतात. कसाबचे भूत निघते ही कथा आहेच. पण त्याच कसाबच्या बॅरकमध्ये मी आणि अनिल देशमुख राहत होतो. मी म्हणालो, कसाबला इथून पुण्याला नेले, तेथेच फासावर लटकवले आणि येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे. पुण्यातून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल?

कसाबला प्रत्यक्ष पाहणारे अनेक जण तेव्हा आर्थर रोड जेलमध्ये होते. ते कसाबच्या बाबतीत अनेक दंतकथा सांगतात. कसाबचे भूत शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. रात्री जागून काढल्या, पण कसाब दिसला नाही. यार्डामध्ये दिवे कधीच विझत नाहीत. लख्ख प्रकाशात भुते फिरकत नाहीत आणि आमच्यासारखे लोक सरकारला भुतासारखे वाटत असल्याने कसाबच्या कोठडीत आम्हाला डांबून ठेवले होते, असं राऊत म्हणतात.

कसाबची कोठडी

यावेळी राऊत यांनी कसाबच्या कोठडीतील माहितीही दिली आहे. मी 12 नंबर यार्डात होतो. आर्थर रोड जेलच्या सगळ्यात शेवटी हे यार्ड आहे. त्या यार्डात शिरण्यासाठी तीन स्वतंत्र दरवाजे आहेत. चारही बाजुंनी बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ भिंत तसेच लोखंडी कवच आहे. हे का? कारण कसाब या यार्डात होता. कसाबचे वास्तव्य असलेल्या यार्डातच मला आणि देशमुखांना ठेवलं होतं. बाहेरचा संपर्क नाही. सूर्यकिरणांची तिरीप नाही, असं राऊत यांनी म्हटलंय.

मी तळमजल्यावर होतो. तेथून एक जिना वर गेलेला. त्यातील एका खोलीत कसाबचे वास्तव्य होते. आता ती खोली बंद आहे. त्या खोलीत आजही कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि एके -47 गन आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांची एक तुकडी होती आणि त्याच्यासाठीच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. तळमजल्यावर आयटीबीपीचे पथक तैनात असे आणि आतमध्ये मुंगीलाही शिरता येणार नाही, अशी सुरक्षा व्यवस्था होती. कसाबला याच यार्डातून शेवटी फाशी देण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु कसाबच्या कटू आठवणींचे ठसे ते आजही जिवंत आहेत, असं या पुस्तकात म्हटलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.