धुळे : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अशा परिस्थितीमध्ये धुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी हि प्रक्रिया राबविली जाते. मात्र इमारती रिकाम्या केल्या जात नाही. आता पुन्हा अशा इमारतींचा सर्व्हे करून महापालिका प्रशासनाकडून नोटीस वाजविण्यास सुरवात करण्यात आली आहे.
शहरासह मनपा हद्दवाढीच्या गावात जीर्ण धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या इमारती पाडणे आवश्यक आहे. पण अद्यापही महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने धोकेदायक असलेल्या इमारतींच्या मालकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटीस देण्याचा सोपस्कर केला जातो आहे.
दरवर्षी दिल्या जातात नोटीस
सुरु होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी धोकेदायक इमारतींचे सर्व्हेक्षण करण्यात येत असते. सव्हेंक्षण झाल्यानंतर त्या इमारत मालकांना इमारत खाली करण्याबाबत नोटीस बजावल्या जातात. अर्थात दरवर्षी हि प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र या इमारती खाली केल्या जात नसल्याचे पाहण्यास मिळते. यातून काही दुर्घटना देखील घडल्या आहेत.
११० धोकेदायक इमारती
दरम्यान पालिका प्रशासनाने या धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या धोकादायक इमारतींच्या बाहेर नोटीसा देखील लावण्यास सुरुवात केली असून पावसाळा दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये; यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे पूर्वनियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरासह हद्दवाढीच्या भागात जवळपास ११० धोकादायक इमारती आहेत.