रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता.१८ ः पिंपळे निलख अंतर्गत रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी येथील सर्व खड्डे दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
पिंपळे निलखमधील विशालनगर डी.पी.रस्त्यावर अनेक ठिकाणी दुतर्फा खड्डे पडले आहेत. गेली अनेक महिन्यांपासून येथील दगडी गतिरोधकांचे दगडी चिरे निघून मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांच्या नजरेस हे खड्डे येत नसल्याने अनेकदा वाहने आपटून अपघात घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर खोदलेल्या चर न बुजविल्याने कामावर चाललेल्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. त्यानंतर स्थापत्य विभागाकडून येथे तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. पिंपळे निलख विशालनगर हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. पुणे बाणेर हिंजवडी वाकड आदी भागांत ये - जा करण्यासाठी या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. प्रमुख बाजार पेठ, शाळा, पेट्रोल पंप, मोठ्या रहिवासी सोसायट्यांचा हा परिसर असल्याने वाहनांची व नागरिकांची या रस्त्यावर मोठी रहदारी असते.
सुस्त प्रशासन- येथील समस्या लक्षात घेता.
गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडून येथे करण्यात आलेल्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हे रस्ते देखभालीसाठी पूर्वी बीआरटीएस विभागाकडे होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच ते स्थापत्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने रस्ते दुरुस्ती कुठला विभाग करणार ? हे महत्त्वाचे नाही, परंतु समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परतेने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांना धोकादायकरित्या रहदारी करावी लागत आहे. अनेकदा हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. पावसाळ्यापूर्वी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- मनीषा कडुसकर, नागरिक
गेली अनेक महिन्यांपासून येथील खड्डे ‘जैसे थे’ आहेत. येथे मोठ्या सोसायट्यांचा रहिवासी भाग आहे. चाकरमानी मंडळी व शाळकरी विद्यार्थ्यांचा बस प्रवास या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर होतो. किमान पावसाळ्याआधी येथील दुरुस्ती कामे करण्यात यावीत.
- गणेश बोंबले, रहिवासी, निको स्काय पार्क सोसायटी
सध्या अवकाळी पाऊस येत असल्याने पावसाच्या उघडीपीनंतर तत्काळ विशालनगर डी.पी.रस्ता व पिंपळे निलख अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील.
- अविनाश चव्हाण, अभियंता (स्थापत्य), पिंपळे निलख