Success Story : धुणी-भांडी करत दिले शिक्षण, तीनही मुली शासन सेवेत; परळीतील कदम कुटुंबातील कन्यांनी केले आई-वडीलांच्या कष्टांचे चीज
esakal May 18, 2025 07:45 PM

परळी वैजनाथ : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पदरी चार अपत्य. त्यांचा सांभाळ शिक्षण कसे करायचे ही विवंचना. मात्र, मोठ्या जिद्दीने ११ घरची धुणी भांडी करत मुलांना शिकविले. अखेर अडीच दशकाची ही संघर्षमय साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली असून तीन मुलींनी एकाचवेळी महापारेषणमध्ये नोकरी मिळविली आहे.

शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी मनिषा आणि विजय कदम. या दांपत्याच्या पोटी तीन मुली आणि मुलगा अशी एकूण चार अपत्ये. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने मुलांचे पोषण आणि शिक्षण कसे करायचे ही विवंचना.

मात्र, आपला संघर्ष मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मनिषा यांनी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी घरकाम केले. धुणी-भांडी धुतली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलींचे शिक्षण आणि घरखर्च भागवला. १० बाय २५ फुटाच्या घरात हे सहा जणांचे कुटुंब नांदत असताना मोठी मुलगी दिक्षा हिने दहावीत चांगली टक्केवारी घेतल्याने तिला पुढे आयटीआय आणि इंजिनिअरिंगपर्यंत शिकवले.

वर्ष २०१९ मध्ये दीक्षा ही मुंबई मेट्रोत काम करते. तिच्या पाठच्या सोनाली आणि समिक्षा या दोन्ही मुलींनीही जिद्दीने अभ्यास केला. लातूर जिल्ह्यातील बावची येथील शासकीय निवासी शाळेत राहून या मुलींनी जिद्दीने अभ्यास करत दहावी आणि त्यानंतर इलेक्ट्रशियन कोर्स पूर्ण केला. काही महिन्यांपूर्वी निघालेल्या महापारेषणच्या भरतीसाठी दीक्षा, सोनाली आणि समिक्षा यांनी अर्ज भरले. याचा निकाल मागच्या आठवड्यात लागला असून यात दिक्षा ही ‘तंत्रज्ञ वर्ग दोन आणि सोनाली, समिक्षा या दोघीही विद्युत सहायक पदासाठी पात्र ठरल्या आहेत.

आता निवांत झाले

मुलांच्या शिक्षणासाठी मी घराबाहेर पडले. १५ वर्षे घरकाम करुन मुलींना शिकवले. तिन्ही मुलींनीही जिद्दीने शिक्षण घेत आज नोकरी मिळवली. मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेत असून मुलींच्या भविष्याची चिंता मिटली आहे. यासाठी मला पती विजय कदम यांची साथ मिळाली असून आता मी निवांत झाल्याने कामाचा ताण कमी करणार आहे.

- मनिषा विजय कदम, शिवाजीनगर, परळी वैजनाथ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.