Harbhajan Singh: 'खरे चाहते फक्त धोनीचे, बाकी सगळे तर पेड फॅन्स', भज्जीला नेमकं म्हणायचं काय?
esakal May 18, 2025 07:45 PM

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार क्रिकेटपटू एमएस धोनीची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही. धोनी कुठेही खेळायला गेला, तरी त्याच्यासाठी चाहते स्टेडियममध्ये गर्दी करताना दिसतात. गेल्या काही वर्षात तर आयपीएलमध्ये सर्वांना याचा प्रत्येय आला आहे.

मैदान कोणतंही असलं तरी चाहते चेन्नईला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर असतात. त्याला चाहत्यांकडून 'थाला' हे टोपननावही देण्यात आलं आहे. त्याचा चाहता वर्ग हा केवळ भारतातच नाही, तर जगभरातही दिसून येतो.

त्याच्या लोकप्रियतेचे आता कौतुक केले आहे. पण त्याने केलेलं विधान हे चर्चेचा विषय देखील ठरत आहे. हरभजन सिंगने धोनीचे चाहते खरे असल्याचे म्हणताना बाकीच्या चाहत्यांना खरेदी केलेले (Paid) म्हटलं आहे.

जिओस्टारशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, 'जितकं उरलं आहे आणि जितका दम आहे, खेळ भाई. माझा संघ असता तर कदाचित मी काहीतरी वेगळा निर्णय घेतला असता. आणि सरळ गोषच आहे की चाहत्यांना त्याने खेळावं असंच वाटत असेल, कारण ते त्याचे चाहते आहेत.

तो पुढे म्हणाला, 'मला वाटतं की जर सर्वात जास्त खरे चाहते कोणाचे असतील तर त्यांचेच (CSk) आहेत. बाकी सर्व तर असेच तयार केलेले आहेत. आजकाल तर सोशल मिडिया अर्धा विकला गेलेला आहे. पण त्याचे चाहते जे आहेत, ते खरे आहेत. बाकी जे तुम्ही इकडे - तिकडे दिसणारे आकडे जे पाहिले, तर जाऊदे त्याबद्दल बोलायला गेलो, तर चर्चा वेगळीच होईल.

हरभजन पुढे म्हणाला, 'एमएस धोनी पाहायला गेलो, तर यावेळी चांगला खेळला आहे. बरा खेळला आहे.'

दरम्यान हरभजनच्या या विधानानंतर त्याला यातून कोणावर निशाणा साधायचा होता का? अशा चर्चा होत आहेत.

दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईची कामगिरी फारशी बरी झालेली नाही. त्यांना सुरुवातीलाच नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीने बाहेर गेल्याने धक्का बसला होता. त्यामुळे धोनीला पुन्हा कर्णधारपदाची धुरा हातात घ्यावी लागली होती.

पण त्यानंतरही फारसा फरक संघाच्या कामगिरीत झाला नाही. चेन्नईने आयपीएल २०२५ मध्ये १२ सामन्यांमध्ये केवळ ३ सामने आत्तापर्यंत जिंकले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.