बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. १८ : चिंचवडगाव आणि थेरगाव परिसराला जोडणाऱ्या थेरगाव - चिंचवड लिंक बास्केट पुलाची
रंगरंगोटी, पदपथ तयार करणे, पथदिवे बसविणे, विजेच्या तारा टाकणे आदी कामे सुरू असून मुख्य रस्त्यासाठी प्रलंबित चिंचवडकडील भूसंपादनाचे प्रयत्न आता महापालिकेकडून परत सुरू झाले आहेत.
चिंचवडगाव आणि थेरगावला जोडणाऱ्या अरुंद धनेश्वर पुलामुळे होणारी हेळसांड थांबावी आणि मोरया गोसावी मंदिर परिसरातील कोंडीत न अडकता सर्वांचा झटपट प्रवास व्हावा या उद्देशाने पवना नदीवर बांधलेल्या थेरगाव - चिंचवडला जोडणाऱ्या लिंक बास्केट समांतर पुलाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, जोड रस्त्याचे काम रखडल्याने हा पूल वापराविना धूळखात पडून आहे. या पुलाच्या कामाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. पाच वर्षांपूर्वी काम सुरू झाले. थेरगावातील समर्थ करिना सोसायटी ते चिंचवडगावातील गुरुकुलम संस्थेजवळ सुमारे शंभर मीटर लांबीचा अन् १८ मीटर रुंद असलेल्या या पुलासाठी सुमारे ३० कोटी खर्च आला आहे. सध्या पुलावर रंगरंगोटी, पदपथ व पथदिवे बसविणे, विजेच्या तारा टाकणे आदी कामे सुरू आहेत. परंतु किरकोळ भूसंपादना अभावी पुलाला मूर्तरूप मिळेनासे झाले आहे. काही हाऊसिंग सोसायट्या व शेतकऱ्यांनी रस्त्यास विरोध केल्याने किरकोळ भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे पूल सध्या वापरात येत नाही.
चिंचवडकडील भूसंपादनाचा विषय आता मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र पुलाला प्रत्यक्षात मुहूर्त कधी लागणार ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चिंचवडगावातील क्रांतितीर्थ चापेकर स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री शहरातील आमदार, खासदार तसेच वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने या पुलाची डागडुजी, रंगरंगोटी आणि डांबरीकरणाची कामे केली होती.
मुख्य रस्त्याचेच काम रेंगाळले
पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी थेरगाव भागातील रस्ता शंभर टक्के पूर्ण झाला आहे. चिंचवडकडील भागात पूल उतरताच मंगलमूर्ती वाड्याकडे जाणारा आणि महापालिकेच्या जलतरण तलावाकडे जाणारे दोन लहान रस्ते वाहतुकीसाठी तयार आहेत. मात्र, गुरुकुलम संस्थेपासून काळेवाडी-चिंचवड लिंक रस्त्याला चिंतामणी मंदिराजवळ जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचेच काम अद्याप होऊ शकले नाही.
कोंडीमुक्त, जलद व सुखकर प्रवास
थेरगाव - चिंचवड लिंक बास्केट पुलावरून वाहतूक सुरू होताच थेरगावकडून चिंचवडकडे जाणाऱ्या नागरिकांची उत्तम सोय होणार आहे. तसेच एम्पायर इस्टेट, मोरया गोसावी राज पार्क, काळेवाडी, चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना जलद व विनाअडथळा ये-जा करता येणार असल्याने वेळ आणि पैसा वाचणार आहे.
थेरगाव - चिंचवड बास्केट पुलावर तसेच दोन्ही बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून सध्या पुलावरील किरकोळ कामे सुरू आहेत. गुरुकुलम शाळेचा परिसर तसेच काही भोईर कुटुंबियांची जागा ताब्यात न आल्याने पुलाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होऊ शकले नाही. मात्र, जागा ताब्यात घेत रस्ता करून पुलाचे उद्घाटन करण्याचे प्रयोजन सुरू आहे.
- देवण्णा गट्टूवार, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
चिंचवड आणि थेरगावकरांसाठी पूल लवकरात लवकर सुरू होणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सध्या भला मोठा वळसा मारून चिंचवडला जावे लागते. पूल सुरू झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. चिंचवड, काळेवाडी, केशवनगर, तानाजीनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव आदी भागांत जलद ये-जा करता येईल.
- झुंजारराव पाटील, रहिवासी