आष्टा : ‘‘भारताने पाकव्याप्त काश्मीर परत घेऊन पाकिस्तानला चांगला धडा शिकवायला पाहिजे होता. भारतीय जनतेची ही अपेक्षा राज्यकर्ते पूर्ण करू शकले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या अद्वितीय राज्य घटनेमुळे अनेक संकटांना सामोरे जाऊनही आपल्या देशाचे ऐक्य अबाधित आहे. त्यांच्या विचारांशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही,’’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
आष्टा येथे बांधलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी श्री. मुणगेकर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, दिलीपराव वग्याणी, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, प्रतिभा पेटारे, प्रतापराव मधाळे, अरुण कांबळे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे उपस्थित होते.
मुणगेकर पुढे म्हणाले, ‘‘आपल्या देशात हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण, अल्पसंख्याक-बहुसंख्याक असे वाद निर्माण करून सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला केले जात आहेत. आता जनतेने आपला खरा शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखायला हवे.’’
जयंत पाटील म्हणाले, ‘‘देशात नेमके काय चाललेले आहे, याची खरी माहिती जनतेपर्यत पोहोचण्याची व्यवस्था संपली आहे. दिवंगत विलासराव शिंदे व माझा मागेच ही इमारत बांधण्याचा प्रयत्न होता. मात्र अनेक तांत्रिक अडचणी होत्या. आज सुंदर व भव्य इमारत उभा राहिलेली पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येतो.’’
वैभव शिंदे म्हणाले, ‘‘विलासराव शिंदे यांचे अपुरे स्वप्न आमदार जयंतराव पाटील यांनी पूर्ण केले.’’ विवेक कोकरे, प्रतापराव मधाळे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मेथे यांनी आभार मानले. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजय यादव, संचालक संजय पाटील, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, संचालक रघुनाथ जाधव, विराज शिंदे, माणिक शेळके, विशाल शिंदे, स्नेहा माळी, विनय कांबळे, उषाताई विरभक्त, सुजाता विरभक्त यांच्यासह आष्टा शहरातील पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.