भारताचा झटका बांगलादेशला फटका! तब्बल 66 हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार, नेमकं प्रकरण काय?
Marathi May 18, 2025 08:25 PM

इंडिया बांगलादेश व्यापार: भारताने बांगलादेशातून (India Bangladesh) आयात होणाऱ्या 42 टक्के वस्तूंवर बंदी घातली आहे. यामुळे बांगलादेशला अंदाजे 770 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 66 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) नुसार, हे दोन्ही देशांच्या आयातीच्या सुमारे 42 टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शनिवारी परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) निर्देशांनंतर जारी केलेल्या या बंदीमुळे भारत आता बांगलादेशातून काही वस्तू कमी प्रमाणात आयात करेल.

बांगलादेशच्या वस्त्र निर्यातीवर परिणाम

भारत सरकारने उचललेल्या या पावलामुळे, आता बांगलादेशातून फक्त तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्न आणि प्लास्टिकच्या वस्तू यासारख्या वस्तू काही विशिष्ट बंदरांमधून भारतात येऊ शकतील. काही वस्तूंच्या जमिनीवरून भारतात प्रवेश पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उदाहरणार्थ, बांगलादेशातून दरवर्षी आयात होणारे सुमारे 618 दशलक्ष डॉलर किमतीचे तयार कपडे आता फक्त कोलकाता आणि नवा शेवा बंदरांमधूनच येऊ शकतील. पूर्वी हे कपडे जमिनीच्या मार्गानेही भारतात आणले जात होते. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या भारतातील कपड्यांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताने नेमका का घेतला निर्णय?

जीटीआरआयच्या अहवालात म्हटले आहे की, भारताने हे पाऊल एकट्याने उचललेले नाही, तर ते बांगलादेशने केलेल्या कारवाईला दिलेले प्रत्युत्तर आहे. बांगलादेशने 2024 च्या अखेरीस अनेक भारतीय वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे, जसे की एप्रिल 2025 पासून जमिनीवरून भारतीय धाग्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. तांदूळासारख्या अनेक वस्तूंच्या शिपमेंटवर नियम कडक करण्यात आले आहेत.

बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री

बांगलादेशची चीनशी वाढती मैत्री पाहून भारताने हे पाऊल उचलल्याचेही अहवालात म्हटले आहे. अलीकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनचा दौरा केला होता. तिथे जाऊन ते म्हणाले, “भारताच्या पूर्वेकडील सात राज्ये, ज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात, ते भूपरिवेष्टित आहेत आणि त्यांना समुद्रात प्रवेश नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी आपणच समुद्राचे रक्षक आहोत, त्यामुळे यात चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याची क्षमता आहे.” या काळात दोन्ही देशांमध्ये 2.1 अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक आणि सहकार्य करार देखील झाले. युनूस यांनी चीनमध्ये भारताबाबत केलेली विधाने आता त्यांना महागात पडली आहे.

पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत

पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशची अर्थव्यवस्थाही मंदीच्या गर्तेत गेली आहे. याला तोंड देण्यासाठी, बांगलादेशने अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे हात पुढे केला होता. 762 दशलक्ष डॉलर्सची मदत मागितली आहे. जी सुमारे 6360 कोटी रुपयांची आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.