आजच्या घडीला पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन अनेक विद्यार्थी सृजनात्मक आणि कलात्मक क्षेत्रांकडे वळत आहेत. विशेषतः कला आणि डिझाईनमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स’ (Bachelor of Fine Arts – BFA) हा एक उत्तम आणि भविष्यकाळात संधी देणारा पर्याय ठरतो. या पदवीअंतर्गत विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रातील विविध अंगांमध्ये सखोल प्रशिक्षण दिलं जातं, जे त्यांच्या कलागुणांना व्यावसायिक स्वरूपात विकसित करण्यास मदत करतं.
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स ही चार वर्षांची पदवी आहे, जी संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, मूर्तिकला, अॅनिमेशन, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, फॅशन डिझाईन आणि आर्ट हिस्टरी अशा विविध कलात्मक शाखांमध्ये मिळवता येते. ही पदवी केवळ कलात्मक शिकवणीपुरती मर्यादित नसून, सैद्धांतिक ज्ञान, सौंदर्यदृष्टी, इतिहास आणि सृजनशीलतेचंही शिक्षण यात दिलं जातं.
BFA मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी १२वी उत्तीर्ण केलेली असावी. काही विद्यापीठांमध्ये कलाशाखेतील १२वीचा अभ्यासक्रम आवश्यक असतो, तर काही ठिकाणी सर्व शाखांमधील विद्यार्थी पात्र असतात. याशिवाय, अनेक संस्था प्रवेशासाठी अप्टिट्यूड टेस्ट किंवा पोर्टफोलिओ सबमिशनही घेतात.
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना रंगसंगती, रेखाटन, फिगर ड्रॉइंग, व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, 3D डिझाईन, डिजिटल आर्ट्स, फोटोग्राफी, स्कल्पचर आणि विविध माध्यमांचा वापर शिकवला जातो. यासोबतच आर्ट हिस्ट्री, सौंदर्यशास्त्र आणि कलेचं समाजाशी नातं या गोष्टींचंही ज्ञान दिलं जातं.
BFA पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करता येतं. चित्रकार, ग्राफिक डिझायनर, अॅनिमेटर, आर्ट डायरेक्टर, फॅशन डिझायनर, इन्टिरियर डिझायनर, टॅटू आर्टिस्ट, फोटोग्राफर, आर्ट टीचर किंवा अॅकॅडेमिक रिसर्चर अशा अनेक संधी त्यांच्या समोर खुल्या असतात. विविध जाहिरात कंपन्या, मीडिया हाऊसेस, एनिमेशन स्टुडिओ, थिएटर ग्रुप्स आणि डिझाईन फर्म्समध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी मागणी आहे.
या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स्वतंत्र कलाकार म्हणून काम करण्याची संधी. चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकार किंवा डिजिटल कलाकार म्हणून आपण स्वतःचं ब्रँड तयार करू शकतो. सोशल मीडियाच्या युगात ही संधी अधिक व्यापक बनली आहे.
BFA नंतर विद्यार्थ्यांना MFA (मास्टर ऑफ फाइन आर्ट्स) किंवा डिझाईनमधील स्पेशलायझेशनसाठीही जाता येतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये या विषयात उच्च शिक्षण घेता येतं.