दिनेश शेठ - चार्टर्ड अकाउंटंट-सीए
भारताला भूतकाळात अनेक वेळा भू-राजकीय धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. परंतु, इतिहासाने हे दाखवले आहे, की युद्धासारख्या स्थितीतही शेअर बाजारातील प्रत्येक मोठी घसरण गुंतवणुकीसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतरची पाकिस्तानबरोबरची तणावाची परिस्थिती लक्षात घेता, शेअर बाजारातील तीव्र चढ-उतारांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता, यातील संधीचा लाभ घेतला पाहिजे. युद्धं ही राष्ट्रीय निर्धाराची आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या शिस्तीचीही परीक्षा घेतात, हे लक्षात घेऊन आपले धोरण आखणे गरजेचे आहे. इतिहासातील काही महत्त्वाची उदाहरणे आणि तत्कालीन स्थितीत निर्माण झालेली गुंतवणुकीची संधी हे जाणून घेऊ या.
कारगिल युद्धकारगिल युद्धादरम्यान अनिश्चिततेमुळे, मे ते जुलै १९९९ या कालावधीत भारतीय शेअर बाजार सुमारे १२ टक्क्यांनी घसरला होता. मात्र भारतीय सैन्याने परिस्थिती हाताळल्यानंतर, पुढील काही महिन्यांत ‘सेन्सेक्स’ ३० टक्क्यांपेक्षा अधिक वधारला. अर्थव्यवस्थेतील वाढ आणि आयटी शेअर वधारल्यामुळे बाजारात पुन्हा तेजी आली आणि गुंतवणूकदारांना भरघोस लाभ झाला.
लष्करी संघर्षभारतीय संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तातमध्ये युद्ध सुरू होण्याच्या भीतीने शेअर बाजार १५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरला. मात्र, नंतर तणाव कमी झाल्यानंतर आणि २००३ मध्ये बाजारात तेजी आली. वर्ष २००३ ते २००७ या कालावधीत अनेक म्युच्युअल फंडांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक दराने सर्वांत मोठी तेजी अनुभवली.
उरी सर्जिकल स्ट्राइकउरी सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी सुरुवातीला शेअर बाजार एकाच दिवसात दोन ते तीन टक्क्यांनी घसरला. परंतु, काही आठवड्यांतच तो सावरला. बाजाराने भारताच्या निर्णायक कृतीकडे भू-राजकीय परिपक्वतेचे लक्षण म्हणून पाहिले आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. पुढील १२ महिन्यांत ‘निफ्टी ५०’ ने जवळजवळ २५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा मिळाला.
ऑपरेशन सिंदूरपहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागतिक गुंतवणूकदार सावध आहेत आणि अस्थिरता वाढली आहे. मात्र, भारताचे मूलभूत आर्थिक घटक जसे, उत्तम ‘जीडीपी’ वाढ, विक्रमी ‘जीएसटी’ संकलन आणि लवचिक कॉर्पोरेट उत्पन्न मजबूत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील चढ-उतारात उत्तम शेअरची खरेदी करून गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.
आर्थिक स्वातंत्र्याची योजनाज्याप्रमाणे भारतीय सैन्य शांततेच्या काळात युद्धाची तयारी करते, त्याचप्रमाणे अस्थिरता येण्यापूर्वीच तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्याचे धोरण तयार केले पाहिजे. अॅसेट अलोकेशनसाठी सोशल मीडियावरील सल्ल्यांवर विश्वास न ठेवता, अनुभवी आर्थिक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्या. भीतीच्या काळात शिस्त हीच हुशार गुंतवणूकदारांना भावनिक गुंतवणूकदारांपासून वेगळे ठरवते. म्हणूनच, वेगापेक्षा दिशा कायमच अधिक महत्त्वाची असते. शहाणे लोक युद्धाचा वापर खिडकी म्हणून करतात, बाजारातून पळून जाण्यासाठी नाही, तर धैर्याने त्यात प्रवेश करण्यासाठी हे लक्षात घ्या.