Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वीपासून प्रसारित होणाऱ्या कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्याच्या प्रोमोचं शूट व्हायरल झालं आहे.
मालिकेचा काही दिवसांपूर्वीच प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, यशला माँ सांगते की ती मुलगी या घरात येऊ शकते पण त्यापूर्वी तिला एक परीक्षा द्यावी लागेल. गणपतीच्या देवळामागे एक तलाव आहे. त्या तलावातून कमळाचं फुल आणायचं. त्यावर यश म्हणतो त्या तलावातून आजपर्यंत कुणीही जिवंत परत आलेलं नाहीये. त्यावर माँ सांगते की, देवच वाचवेल तिला. कावेरी कमळाचं फुल आणण्यात यशस्वी होते पण पण तिला चक्कर येते तेव्हा यश तिला वाचवतो.
20 मेला प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यातच या सीनचं मेकिंग सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. या मेकिंगमध्ये गिरीजा मालिकेच्या कॅमेरा टीमबरोबर उतरून दलदलीत सीन शूट करताना दिसतेय. तिला हा सीन शूट करताना त्रास होत असल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. पण तरीही जिद्दीने गिरिजाने हा सीन पूर्ण केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.
अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून मालिकेच्या टीमचं कौतुक केलं. "एका सीनसाठी टीम किती मेहनत घेते. हॅट्स ऑफ गिरीजा आणि संपूर्ण मालिकेची टीम","गिरीजा तू खूप मेहनती आहेस पण असा जीव धोक्यात घालून शूट करू नका" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. तर काहींनी मालिकेच्या ट्विस्टवरही टीका केली. "इथे हिचा मुलगा मेलाय आणि या बाईला कमळाचं फुल हवंय","माँ किती स्वार्थी आहे कावेरीला उगाच त्रास देते","मुलगा मेल्यावर कोणती बाई परीक्षा घेईल. काहीही दाखवतात." अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
मालिकेचा हा विशेष भाग 20 मे ला प्रसारित होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका कोण होतीस तू काय झालीस तू सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.