यशस्वी जयस्वाल आणि प्रीति झिंटा दरम्यान काय चर्चा झाली? समोर आला व्हिडीओ
GH News May 19, 2025 10:06 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 59 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने 20 षटकात 5 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. पण राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 7 गडी गमवून फक्त 209 धावा करता आल्या. पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सवर 10 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवला. या सामन्यानंतर पंजाब किंग्सची मालकीन प्रीति झिंटा आणि यशस्वी जयस्वालचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दोघं चर्चा करताना दिसत आहेत. या चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यानंतर प्रीति झिंटा आणि यशस्वी जयस्वाल जयपूरच्या चाहत्यांचं कौतुक करत होते. जयपूरमध्ये इतकं कडाक्याचं ऊन असूनही प्रेक्षकांनी मैदान भरून गेलं होते.

पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 18 मे रोजी सामना पार पडला. दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात झाली. पण प्रेक्षक 2 वाजल्यापासूनच मैदानात आले होते. क्रीडारसिकांचं प्रेम पाहून प्रीति झिंटाही आवाक् झाली. या विषयावर यशस्वी जयस्वालने प्रीति झिंटाला सांगितलं की, स्टेडियममध्ये शेड नाही तरीही क्रीडारसिक कडक उन्हात सामना पाहण्यासाठी आले होते.

पंजाब किंग्सने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली. त्याने 25 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. पण हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि मिचेल ओवनने त्याचा झेल पकडला. तर वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 40 धावा करून बाद झाला. या सामन्यात पंजाब किंग्सकडून हरप्रीत ब्रारने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले. तर मार्को यानसेन आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

राजस्थान रॉयल्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर पंजाब किंग्सने प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय केलं आहे. मात्र टॉप 2 मध्ये राहण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण टॉप दोन मध्ये असलेल्या संघांना मोठी संधी मिळते. विजय झाला तर थेट फायनल, पराभव झाला तर मग पुन्हा एक संधी मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.