तर खरं खोटं करायला… गोगावलेंचे सुनिल तटकरेंना ओपन चॅलेंज, वाद टोकला!
GH News May 19, 2025 10:06 PM

Bharat Gogawale And Sunil Tatkare : रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे आणि शिंदे गटाचे नेते तथा आमदार भरत गोगावले यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. याच विरोधामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा इथे प्रतिष्ठेचा होऊन बसलेला आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांतील वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात गोगावले यांचे नाव न घेता वेगवेगळे आरोप केले आहेत. तसेच गोगावले यांची नक्कलही करून दाखवली आहे. त्यानंतर आता गोगावले यांनीदेखील पलटवार केला असून हिम्मत असेल तर मंदिरात येऊन शपथ घ्या, असे खुले आव्हान तटकरे यांना दिले आहे.

गोगावले यांनी नेमकं काय आव्हान केलं?

रविवारी म्हणजेच 18 मे 2025 रोजी महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तटकरे यांनी तुफानी भाषण केले. याच भाषणात बोलताना त्यांनी गोगावले यांच्यावर टीका केली. युती असताना लोकसभेच्या निवडणुकीत महाड मतदारसंघात प्रामाणिकपणे काम झालेले नाही. मला त्या मतदारसंघात फक्त 3 हजारांचे मताधिक्य होते. मात्र गोगावले विधानसभा निवडणुकीतून 29 हजार मतांनी निवडून आले, असे तटकरे म्हणाले. गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीत माझ्यासाठी प्रमाणिकपणे काम केले नाही, असा अर्थ त्यांच्या या बोलण्यात होता. तसेच संयमाचा कडेलोड होऊ देऊ नका असा इशाराही तटकरे यांनी गोगावले यांना दिला होता.

त्यांच्या याच आरोपांना आता गोगावले यांनी उत्तर दिले आहे. “आम्ही गद्दारी केल्याचे एकही उदाहरण दाखवून द्या. मी राजकारण सोडायला तयार आहे. खरे खोट करायचे असेल तर त्यांनी महाडच्या वितीने विरेश्वर मंदिरात यावे,” असे आव्हानच गोगावले यांनी तटकरे यांना दिले आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचं काय?

दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटलेला नाही. तटकरे आणि गोगावले या पदासाठी अजूनही अडून आहेत. रायगडला लवकरच पालकमंत्री मिळेस. याबाबतचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यापूर्वी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र वाद वाढल्याने ही नियुक्ती मागे घेण्यात आली होती. तेव्हापासून या जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळालेला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.